Henry Hub A Revolutionary Change In The Economics Of Natural Gas
नैसर्गिक वायूच्या अर्थकारणाचे केंद्र ‘हेन्री हब’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
साव्या शतकाच्या सुरुवातीला केवळ तेलविहिरींवरील निरुपयोगी उप-उत्पादन म्हणून जाळून नष्ट केला जाणारा हा वायू, आज अमेरिकेच्या 'शेल क्रांती', कतारच्या 'नॉर्थ फील्ड' विस्तारीकरण आणि रशियाच्या 'पॉवर ऑफ सायबेरिया' पाइपलाइनच्या माध्यमातून, युरोपियन युनियनची (टीटीएफ) ऊर्जा-सुरक्षा आणि आशियाई (जेकेएम – जपान कोरिया मार्कर) प्रीमियम ठरवणारे जागतिक भू-राजकारणाचे सर्वांत मोठे अस्त्र बनला आहे. ‘हेन्री (हेनरी) हब’ म्हणजे अमेरिकेतील लुइझियाना राज्यातील नैसर्गिक वायूचे मुख्य पाइपलाइन जंक्शन, याच एका ठिकाणावरून जगभरातल्या नैसर्गिक वायू बाजाराचा भाव ठरतो. न्यूयॉर्क मर्कंटाइल एक्स्चेंज वर ट्रेड होणाऱ्या नैसर्गिक वायू फ्युचर्सचा हा डिलिव्हरी पॉइंट आणि मुख्य किंमत-बेंचमार्क म्हणून वापरला जातो. भू-राजकीय तणावामुळे 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' होणारी वाहतूक विस्कळीत झाल्यावर जागतिक एलएनजी पुरवठा साखळीत मोठी अडचण निर्माण झाली पुरवठा घटला आणि किमतीत प्रचंड अस्थिरता आली.
जागतिक भांडवल आणि महासत्तांची मक्तेदारी :रशिया-युक्रेन युद्ध आणि 'नॉर्ड स्ट्रीम' पाइपलाइन विध्वंसानंतर जागतिक भांडवलाचा ओघ युरोपकडून अमेरिकेच्या 'गल्फ कोस्ट' वरील लिक्विफायड नॅचरल गॅस टर्मिनल्सकडे वळला. त्यातच अमेरिकेत शेल बूम आणि डेटा सेंटर-एआय मागणीने हेन्री हब किंमती धरून ठेवल्या. युरोपला रशियन गॅसच्या तावडीतून सोडवण्याच्या ' आरइ-पॉवर-ईयू' करारामुळे, ऊर्जा बाजाराची सूत्रे आणि डॉलरची मक्तेदारी अमेरिकेच्या 'हेन्री हब'कडे सरकताना दिसतात, दुसरीकडे कतार आणि ऑस्ट्रेलिया आशियाई बाजारपेठेत दीर्घकालीन करार करून भांडवली गुंतवणुकीवर भर देतील असे चित्र दिसते. जागतिक पुरवठा-मागणी, हवामान, भूराजकारण आणि भांडवल प्रवाह हे जागतिक किंमतीचे स्तंभ.
‘एमएमबीटीयू’चे एकक
गॅसचे भौतिक आकारमान हे तापमान आणि दाबाप्रमाणे बदलत असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारात त्याला 'प्रती मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट्स' (एमएमबीटीयू) या जागतिक ऊर्जा एककात मोजले जाते. उत्पादन, वहन आणि वित्तीय 'डेरिव्हेटिव्ह्ज' मधील व्यवहार वायूच्या आकारमानावर न ठरता उष्णतेवर / ऊर्जा क्षमतेवर निर्धारित होतात. 'एमएमबीटीयू' हे जागतिक मानक आहे. हेन्री हब (अमेरिका), टीटीएफ (युरोप), आणि एमसीएक्स (भारत) सर्वांनी हेच एकक स्वीकारले, जेणेकरून किंमतींची तुलना सोपी होईल.
आपल्याकडे एमसीएक्स वरील १,२५० एमएमबीटीयूचा 'स्टँडर्ड' करार आणि २५० एमएमबीटीयूचा 'मिनी' करार संस्थात्मक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना ट्रेडिंग संधी उप्लब्ध करून देतात.
बाजारातील घडामोडी
नॅचरल गॅस हा हेबर-बॉश प्रक्रियेमार्फत युरिया व अमोनिया उत्पादनाचा मुख्य कणा असल्याने, आंतरराष्ट्रीय गॅसच्या किंमतीतील 'कंटँगो' किंवा 'बॅकवर्डेशन' थेट स्थानिक खतांच्या किमतीशी गुणोत्तर साधतात आणि शेतीच्या लागवड खर्चात त्याचे रूपांतर होते. वायू महाग म्हणजे युरिया उत्पादन खर्च वाढतो, सरकारी अनुदान वाढते, अनपेक्षित वित्तीय तूट आणि अन्न महागाई म्हणजे बॉन्ड मार्केटला झटका!
दुसरीकडे, बिगर-कृषी क्षेत्रात वायू-आधारित ऊर्जा महाग झाली की ॲल्युमिनियम व तांबे स्मेल्टिंगचा खर्च वाढतो, पेट्रोकेमिकल साखळीमार्फत नाफ्था व पॉलिमरच्या किंमतीही बदलतात. स्पंज आयर्न, काच आणि सिरॅमिक्स उद्योगांच्या भट्ट्या गॅसवर अवलंबून असल्याने, गॅसचे दर देशांतर्गत औद्योगिक नफ्याचे मार्जिन आणि पर्यायाने संपूर्ण भांडवली बाजाराची दिशा ठरवतात. वायूचा भाव हा औद्योगिक साखळीचा सूत्रधार आहे. भारतात खते, शहरी गॅस, वीज आणि रिफायनरी हे मुख्य ग्राहक. किरीट पारीख समितीच्या शिफारशींनुसार, सरकारने देशांतर्गत गॅसचे दर जागतिक हब ऐवजी थेट 'भारतीय क्रूड बास्केट'शी जोडले आणि त्याला किमान आणि कमाल मर्यादा घालून दिली आहे.
थोडक्यात सांगायचे तर, कोळसा आणि तेल ह्यासोबत नॅचरल गॅसच्या धोरणांवर देखील भविष्यातील जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय महासत्ता ठरतील. कमोडिटी ट्रेडर्स आणि व्यापाऱ्यांनी या नव्या वाऱ्याची दिशा अचूक ओळखूनच आपल्या व्यवहाराची शिडे उभारावीत. 'इंडियन गॅस एक्सचेंज' 'युनिफाइड टॅरिफ' आणि किरीट पारीख समितीच्या धोरणांमुळे भारतीय नैसर्गिक वायू बाजाराने नवीन दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
ऊर्जा मिश्रणात गॅसचा वाटा १५% पर्यंत नेण्याच्या उद्दिष्टामुळे 'सिटी (शहरी) गॅस' आणि औद्योगिक क्षेत्रांतून मागणीत वाढ होऊ शकते, मात्र नैसर्गिक वायूला जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवल्याने निर्माण होणारा दुहेरी करभार हा सद्यस्थितीत मुक्त आंतरराज्यीय व्यापारातील अडथळा ठरू शकतो. अमॅरन्थ अ ॅडव्हायजर्सचा २००६ मधील प्रसंग हा मोठ्या धक्क्यांपैकी एक मानला जातो. नैसर्गिक वायू फ्युचर्समध्ये अतिरेकी सट्टेबाजी करताना त्यांनी सहा अब्ज डॉलर्स हून अधिक नुकसान केले, ज्यामुळे हेज फंड उद्योगाला मोठा झटका बसला आणि पुनश्च जोखीम व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित झाले. गॅस बाजारातील क्षणाक्षणाला बदलणारी जीवघेणी अस्थिरता पाहता, ‘नाविका रे, वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे’ ह्या सुमनजींच्या लयीत, मिनी करार, ऑप्शन्स, हेजिंग, आणि स्प्रेडस चा शिताफीने वापर करणे हीच काळाची गरज आहे. जागतिक स्तरावरचे आक्रमक भांडवली धोरण, तापमानातील चढउतार आणि थंडी असो व उष्णता दोन्ही प्रदेशात होणारी गॅस ची मागणी, जागतिक ऊर्जा करार आणि भारताचे धोरण या चौकोनातला अस्थिर बाजार, हा केवळ सखोल अभ्यास आणि संयमानेच जिंकता येईल!
(सदर लेख हा वाचकांच्या माहितीसाठी असून ह्याला ट्रेडिंग अथवा व्यापारी सल्ला समजू नये.)