संघात जातीचा निकष नाही

महाराष्ट्र टाइम्स

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत संघाची भूमिका स्पष्ट केली. जातीय भेदभावाची भावना संपुष्टात येईपर्यंत आरक्षण मिळायला हवे, असे ते म्हणाले. भविष्यात अनुसूचित जाती किंवा जमातीतील व्यक्तीही सरसंघचालक होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. बांगलादेशातील हिंदूंच्या हितासाठी जगभरातील हिंदू एकत्र येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

caste criteria in rss and ending of discrimination

‘जातीय भेदभावाची भावना जात नाही आणि तशा व्यक्तिगत घटना घडत नाहीत तोपर्यंत आरक्षण मिळायला हवे, ही संघाची पूर्वीपासूनच भूमिका आहे. परंतु हा भेदभाव नियम, कायद्याने नव्हे, तर फक्त सद्भावनेमुळेच संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे जे लोक सुस्थितीत आहेत, त्यांनी वंचितांना आधार देणे, स्वत: थोडा त्याग करणे गरजेचे आहे. आज जात-पात केवळ स्वार्थी राजकारणामुळे आहे. राजकीय लोक ही शक्कल अवलंबतात कारण ती यशस्वी ठरते,’ असे मत भागवत यांनी मांडले.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालक होण्यासाठी एखादी व्यक्ती ब्राह्मण असणे ही पात्रता नाही आणि अनुसूचित जाती किंवा जमातीची असणे ही अपात्रता नाही. त्यामुळे योग्य व्यक्ती असेल, तर भविष्यात त्या प्रवर्गातील व्यक्तीही या पदावर विराजमान होऊ शकते,’ असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी केले.

‘माझ्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी बाजूला होण्याविषयी स्वयंसेवकांना सांगितले होते. मात्र, तुम्ही धडधाकट आहात, काम करत आहात, असे सांगून त्यांनी आग्रह धरला म्हणून मी आजही कार्यरत आहे. संघ जेव्हा सांगेल तेव्हा मी पायउतार होईन,’ असेही भागवत यांनी स्पष्ट केले. संघाचे काम कधीही इंग्रजीत होणार नसल्याचे ठाम प्रतिपादनही भागवत यांनी केले.

‘१९४०पर्यंत आपल्या देशातील सर्व विचारसरणीचे लोक या निष्कर्षापर्यंत आले होते की हिंदुस्थान हे हिंदूराष्ट्र आहे. परंतु दुसऱ्या महायुद्धावेळच्या जागतिक परिवर्तनाने आपल्या देशातील लोकांच्या राजकीय स्वार्थातही परिवर्तन झाले. तेव्हापासून भारत एक राष्ट्र नाही, इंग्रजांनी त्याचे एका राष्ट्रात रूपांतर केले वगैरे भ्रम लोकांच्या मनात निर्माण केले गेले.

‘बांगलादेशामधील सव्वा कोटी हिंदू एकत्र झाले, तर तेथील राजकारणाचा उपयोग ते आपल्या भल्यासाठी करू शकतील. सुदैवाने त्यांनी ठरवले आहे, की आम्ही पलायन न करता लढू. त्याविषयी आपण व जगभरातील हिंदू आपाल्या परीने जे काही शक्य असेल ते करू, याची शाश्वती मी देऊ शकतो,’ अशी हमी त्यांनी या वेळी दिली.