आंतरजातीय विवाह केल्याने ‘तिला’ जातपंचायतीकडून बहिष्कृत करण्यात आले होते. पाच वर्षांपासून ‘ती’ आपल्या माहेरी जाऊ शकली नव्हती. मात्र, गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) ‘ती’ सन्मानपूर्वक माहेरी गेली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अंधश्रद्धा निरर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ‘तिचा’ पुन्हा माहेरवाशीण बनण्याचा मार्ग सुकर झाला.
मनीषा (नाव बदलले आहे.) ही भटके विमुक्त प्रवर्गातील असून, तिच्या अंगावर पांढरे डाग (कोड) असल्याने अशी स्त्री धार्मिक कार्यात चालत नाही, अशा अंधश्रद्धेमुळे तिच्याशी जातीतील चांगला मुलगा लग्नासाठी तयार होत नव्हता. मग तिने अन्य समाजातील चेतनसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला. तिच्या समाजात मुलीला आंतरजातीय विवाह करण्यास बंदी होती. त्यामुळे तिच्या जातपंचायत ीने तिला व तिच्या परिवाराला जात बहिष्कृत केले. तिच्या परिवाराने ५१ हजार रुपये दंड भरून जातीत प्रवेश मिळवला. पण, मनीषावरचा बहिष्कार कायम राहिला. गेल्या पाच वर्षांपासून ती आपल्या माहेरी जाऊ शकली नव्हती. तिला तिच्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहता यावे, अशी कैफियत तिने जातपंचायत मूठमती अभियान तथा ‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांच्याकडे मांडली. चांदगुडे यांनी करणाऱ्या डॉ. गोऱ्हे यांची मदत घेतली.
..अन् बहिष्कार उठला
डॉ. गोऱ्हे यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी पोलिस महानिरीक्षांसोबत बैठक घेतली. त्यानुसार त्यांनी नंदुरबारच्या पोलिस अधीक्षकांना मनीषाला सुरक्षा पुरवून लग्नाला हजर राहण्याप्रकरणी मदत करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे अक्कलकुवा पोलिस ठाण्यात जातपंचायतीच्या पंचांना बोलावल्यावर तिने लग्नास येण्यास अडसर नसल्याचे त्यांनी लिहून दिले. त्यामुळे बहिष्कार उठल्यामुळे आपल्या भावाच्या गुरुवारी झालेल्या विवाहास मनीषा हजर राहिली. आपले आई-वडील,भाऊ , बहीण व नातेवाइकांना ती पाच वर्षांनंतर प्रथमच भेटली. समाजाने तिचा सन्मानपूर्वक स्वीकार केला. याबद्दल तिने आनंद व्यक्त करीत तिला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
‘अंनिस’ने एका बाजूने संबंधित जातपंचायतीच्या पंचांशी सुसंवाद साधत आणि दुसऱ्या बाजूने कायद्याचा धाक दाखवत जातपंचायत बरखास्त करण्याची विनंती केली. पंचांनीदेखील मोठ्या मनाने त्यास होकार दिला. त्यानंतर शुक्रवारी (दि. २७) नाशिक येथे त्यांची जातपंचायत बरखास्त करीत आंतरजातीय विवाहांनाही परवानगी देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.






