गोलंदाज सपशेल अपयशी ठरल्या, तर ४१० धावांचे आव्हान बघून फलंदाजांनी लढण्याची किमान तयारीही दाखवली नाही! यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे क्रिकेट मालिकेत भारतीय महिला संघावर ०-३ अशा एकतर्फी पराभवाची नामुष्की आली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या भारताचा यजमान ऑस्ट्रेलियाने १८५ धावांनी फडशा पाडला.
तीन महिन्यापूर्वी मायदेशात वनडे क्रिकेटचे जगज्जेतेपद पटकावणाऱ्या भारताला मालिकेतील एकही लढत जिंकता आली नाही. कारकिर्दीतील अखेरची वनडे खेळणारी कर्णधार अलिसा हिली हिने तब्बल २७ चौकार, २ षटकारांचा पाऊस पाडत ९८ चेंडूंतच १५८ धावांची तडाखेबंद खेळी केली. तर यष्टिरक्षक, फलंदाज बेथ मूनी हिनेही (१०६) शतक झळकावल्याने ऑस्ट्रेलियाने ७ बाद ४०९ धावांचा डोंगर उभारला. अलिसा हिला भारतीय संघाने ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला.
भारताच्या निष्प्रभ माऱ्याचा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी फायदा घेत ५१ चौकार आणि सहा षटकारांचा चोपही दिला. विकेट मिळत नसताना किमान धावांवर अंकुश ठेवणेही भारतीय गोलंदाजांना जमले नाही. यामुळे पाचही गोलंदाजांना साडेसहापेक्षा जास्त सरासरीने मार पडला. यातही श्रीचारिणी हिच्या १० षटकांत १०६ धावांची दमदार वसूली झाली. अनुभवी दीप्ती शर्माच्या १० षटकांत ९० धावा कुटल्या गेल्या. ४१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मानधना धावांचे खातेही न उघडता परतली.







