गुरू तेग बहादूरांचे बलिदान मानवरक्षणासाठी

महाराष्ट्र टाइम्स

Union Home Minister Amit Shah stated Guru Tegh Bahadur's sacrifice protected faith, freedom, and humanity across India. Prime Minister Narendra Modi addressed a gathering, highlighting the Guru's sacrifice as a symbol of India's values. The Prime Minister announced plans for preserving Sikh heritage, including historical gurdwaras and digital museums.

गुरू तेग बहादूरांचे बलिदान मानवरक्षणासाठी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘गुरू तेग बहादूर यांचे बलिदान हे एका धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतातील श्रद्धा-स्वातंत्र्य आणि मानवतेचे संरक्षण करणारे आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कार्यक्रमात केले. ‘शीख परंपरेतील सेवा, समता आणि शौर्याचा आदर्श आजच्या पिढीने अंगीकारावा,’ असे आवाहनही त्यांनी केले. ‘गुरूंचे बलिदान हे धार्मिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी दिलेले सर्वोच्च उदाहरण असून भारताच्या लोकशाही मूल्यांना दिशा देणारे आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

‘गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे बलिदान हे संपूर्ण मानवजातीच्या श्रद्धा-स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले अद्वितीय उदाहरण आहे. त्यांचा त्याग भारताच्या सांस्कृतिक आत्म्याचा शाश्वत दीप आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी खारघर येथे आयोजित शहिदी समागम कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना केले.

श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमात देशभरातून हजारो भाविक सहभागी झाले होते. ‘विविधतेतील एकता आणि सर्व धर्मांचा सन्मान हीच भारताची ओळख आहे. गुरू तेग बहादूर यांचे बलिदान हे त्या मूल्यांचे सर्वोच्च प्रतीक आहे,’ असे मोदी यांनी नमूद केले. यावेळी पंतप्रधानांनी शीख वारसा संवर्धनासाठी काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या. ‘देशातील ऐतिहासिक गुरुद्वारांच्या जतन-संवर्धनासाठी विशेष राष्ट्रीय योजना राबविण्यात येणार आहे. तसेच शीख धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या पर्यटन परिघाचा विस्तार करून जागतिक धार्मिक पर्यटनाला चालना दिली जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले. शीख इतिहास आणि परंपरेचे डिजिटल संग्रहालय उभारण्याची योजना लवकरच राबविण्यात येणार असून युवकांना शीख गुरूंच्या शिकवणीची माहिती देण्यासाठी शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला.

‘शीख समाजाने देशाच्या सुरक्षेत, स्वातंत्र्य चळवळीत आणि सामाजिक सेवेत दिलेले योगदान अमूल्य आहे. सेवा, समता आणि शौर्य ही शीख परंपरेची त्रिसूत्री आजच्या भारताला प्रेरणा देणारी आहे,’ असे मोदी यांनी नमूद केले.