अहिल्यानगर : गेल्या पंधरा दिवसांत नगर व पारनेर तालुक्यांतील गावांत अज्ञात रोगाने ३२ गायींचा मृत्यू झाला. याची प्रशासनाने दखल घेतली असून, पुण्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या रोग अन्वेशन विभागाच्या पशुवैद्यकांनी मृत गायींची तपासणी केली. त्यांचा अहवाल आल्यानंतर नेमके काय होत आहे, हे स्पष्ट होणार आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले, की गायीच्या शरीरातील तपमान अचानक कमी होऊन त्या चारा खाणे बंद करतात. त्यानंतर मागील बाजूला पक्षाघात होऊन आधी मागचे दोन पाय निकामी होतात. यामुळे गायी खाली बसतात. दिवसभरातच हा आजार पसरत जाऊन गायीचा मृत्यू होतो. नगर आणि पारनेर तालुक्यांत हे प्रकार जास्त असून, गेल्या पंधरा दिवसांत ३२ गायी दगावल्या आहेत.
पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ आणि नगर तालुक्यातील हिवरेबाजार , खातगाव टाकळीसह आजूबाजूच्या गावांत गायींमध्ये या रोगाचा प्रार्दुभाव दिसत आहे.
दरम्यान, एका गायीची किंमत एक ते दीड लाख रुपये असल्याने, सरकारने किमान ७५ टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केली.







