कविता, संगीताच्या माध्यमातून मैत्री आणि प्रेमाची आठवण झाल्याने ‘ यमक वगैरे ’ या कार्यक्रमाने रसिकांना पुन्हा एकदा कॉलेजच्या कट्ट्यावर नेले. ‘लग जा गले’ या हिंदी गाण्याचे मराठीतून सादरीकरण करण्यात आले. ‘घर मोंहे’ या गाण्यांच्या सादरीकरणात आणि टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रमाची सांगता झाली.
कविता, संगीत आणि संवाद यांचा सुरेल मेळ साधणारा ‘यमक वगैरे ’ हा स्वरचित कविता आणि गाण्यांचा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला आणि गाजला. तरुणाईच्या स्वरचित कवितांना सुश्राव्य संगीताची जोड देऊन, शब्दांच्या आणि सुरांच्या दुनियेत रसिकांना नेणारा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मनाचा ठाव घेणारा ठरला.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ‘ मायमराठी कलासंगम उत्सव मराठीचा’ या सोहळ्यात ‘यमक वगैरे’ या स्वरचित कविता आणि गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केवळ यमक जुळवणारी कविता नव्हती, तर प्रेम, मैत्री आणि मराठी अस्मितेवर आधारित रचनाही होत्या. चारोळ्यांच्या मिश्किल फटक्यांपासून भावस्पर्शी गाण्यांपर्यंत आणि दिलखुलास गप्पांनी रसिकांना खिळवून ठेवले. आदित्य महाजन यांनी कवितांच्या सादरीकरणासह निवेदन केले. मयुरी मंडलिक आणि निरंजन माळोदे यांनीही कवितांसह चारोळ्या, शायरीचे सादरीकरण केले. गायनाची धुरा मुग्धा भट-ढोले यांनी सांभाळली. गिटारवर ओम पिंपळगावकर, तबल्यावर अमित लिमये, की-बोर्ड व गायनात अद्वैत पाटील आणि बासरीवर प्रीतम देवडीकर यांच्या सुरेल साथीने सादरीकरण झाले.
मयुरी मंडलिक यांनी ‘आई होताना’ आणि ‘प्रेमाचे रंग’ या कवितांमधून भावनेचे पदर उलगडले. आदित्य महाजन यांनी ‘भारत दर्शन’ आणि ‘सखी’ या रचनांतून सामाजिक जाणिवा आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा दिला, तर निरांजन यांनी ‘माय मराठी’ आणि ‘कितीदा नव्याने’ या कवितांमधून मातृभाषेचा अभिमान आणि नात्यांची गुंफण मांडली. स्वरचित कविता, चारोळ्या, शायरी आणि गप्पांच्या माध्यमातून प्रेम, मैत्री आणि मराठीपण या विषयांचा सुंदर प्रवास रसिकांना अनुभवता आला. शब्दांच्या आशयाला सुरेल संगीताची साथ लाभल्याने रसिक मंत्रमुग्ध झाले आणि टाळ्यांच्या गजरात प्रत्येक सादरीकरणाला दाद मिळाली. आत्मीय संवाद, तरुणाईची अभिव्यक्ती आणि मराठीपणाची ओल यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे वृत्तसंपादक श्रीपाद ब्रह्मे यांनी कलाकारांचे स्वागत केले, तर मुख्य उपसंपादक सुरेंद्र डोळ यांनी सूत्रसंचालन केले.






