दक्षिण आफ्रिका अपराजित

महाराष्ट्र टाइम्स

South Africa continued their T20 Cricket World Cup dominance by beating Zimbabwe. They won their final Super 8 match by five wickets. This victory ensured South Africa finished top of Group A with an unbeaten record. Zimbabwe fought hard but could not overcome the strong South African side. The win sets South Africa up well for the semi-finals.

दक्षिण आफ्रिका अपराजित

दक्षिण आफ्रिकेने टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमधील आपला धडाका शनिवारी कायम राखला. ‘ सुपर ८ ’मधील आपल्या अखेरच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा पाच विकेटनी पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिकेने गट एकमध्ये सहा गुणांसह अव्वल स्थान मिळवले. यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका संघ अपराजित आहे.

अरुण जेटली स्टेडियममध्ये ही लढत झाली. गतउपविजेता दक्षिण आफ्रिका संघ यंदाच्या स्पर्धेत अपराजित आहे, तसाच धडाका कायम राखण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ उत्सुक होता. उपांत्य फेरीतील प्रवेश यापूर्वीच निश्चित झाल्याने झिम्बाब्वेविरुद्धची लढत केवळ औपचारिकता म्हणून राहिली होती. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कॅगिसो रबाडा, मार्को यान्सन आणि केशव महाराज यांना विश्रांती दिली, त्याजागी ॲनरिक नॉर्किया, क्वेना माफाका आणि जॉर्ज लिंडे यांना संधी दिली. दुसरीकडे, साखळीत चमकदार कामगिरी करणाऱ्या झिम्बाब्वेला ‘सुपर ८’मध्ये छाप पाडता आली नव्हती. त्यामुळे आपल्या मोहिमेचा शेवट गोड करण्यास झिम्बाब्वे संघ उत्सुक होता.

झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने फटकेबाजी केली. मात्र, इतर फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. भारताविरुद्ध नाबाद ९७ धावांची खेळी करणारा ब्रायन बेनेट पंधरा धावांची खेळी करू शकला. सिकंदर रझा आणि क्लाइव्ह मादांदे यांनी सहाव्या विकेटसाठी २९ चेंडूंत ३९ धावांची भागीदारी रचली. ही झिम्बाब्वेकडून सामन्यात नोंदवली गेलेली सर्वोच्च भागीदारी ठरली.

प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार ऐडन मार्करम चार धावा, तर क्विंटन डिकॉक खाते न उघडता परतला. सिकंदरनेच दोघांना परतीचा मार्ग दाखवला. रायन रिकल्टनही ३१ धावांची भर घालून परतला. त्या वेळी झिम्बाब्वेची ३ बाद ४३ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर ब्रेव्हिस आणि मिलर यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. मुझारबानीने मिलरला, तर सिकंदरने ब्रेव्हिसला बाद केले. मिलर-ब्रेव्हिस यांनी २५ चेंडूंत ५० धावांची भागीदारी रचली. ही जोडी परतल्यानंतर स्टब्स आणि लिंडे यांनी ४३ चेंडूंत ५३ धावांची अभेद्य भागीदारी रचून दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

झिम्बाब्वे - २० षटकांत ७ बाद १५३ (सिकंदर ७३ धावा - ४३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार, मादांदे नाबाद २६ - २० चेंडूंत ३ चौकार, बेनेट १५- १३ चेंडूंत १ चौकार व १ षटकार, लिंडे ३-०-२२-१, माफाका ४-०-२१-२, ल्यूंगी एन्गिडी ४-०-२९-१, ॲनरिक नॉर्किया ४-०-२९-१, कॉर्बिन बॉश ४-०-४०-२) वि. दक्षिण आफ्रिका - १७.५ षटकांत ५ बाद १५४ (रायन रिकल्टन ३१- २२ चेंडूंत ४ षटकार, डिवाल्ड ब्रेव्हिस ४२-१८ चेंडूंत दोन चौकार व ४ षटकार, डेव्हिड मिलर २२-१६ चेंडूंत २ चौकार व २ षटकार, ट्रिस्टन स्टब्स नाबाद २१-२४ चेंडूंत, जॉर्ज लिंडे नाबाद ३०-२१ चेंडूंत २ चौकार व १ षटकार, सिकंदर रझा ४-०-२९-३, ब्लेसिंग मुझारबानी ३.५-०-३२-१, ब्रॅड इव्हान्स ३-०-२२-१).