गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘ महाराष्ट्र प्रतिबंधक गैरप्रकार कायदा १९८२’ची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, कॉपी किंवा इतर गैरप्रकार करताना आढळल्यास संबंधितांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत. मंडळाच्या या सर्वंकष उपाययोजनांमुळे यंदाच्या परीक्षा अधिक शिस्तबद्ध आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडतील, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, पारदर्शक आणि तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा कडक प्रशासनिक यंत्रणा सज्ज केली आहे. परीक्षा केंद्रांभोवती गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाची अंमलबजावणी पोलिसांच्या मदतीने करण्यात येणार आहे.
प्रश्नपत्रिका गळती, कॉपी साहित्याची देवाणघेवाण किंवा बाहेरून मदत पोहोचवण्याचे प्रकार रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. मंडळाच्या सूचनांनुसार जिल्हास्तरावर प्रशासनाला झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रांच्या परिसरात संशयास्पद हालचालींवरही लक्ष ठेवले जाणार आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये सर्व परिक्षेत्रांतील विशेष पोलिस महानिरीक्षकांचा समावेश असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समित्या कार्यरत राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पथके प्रत्येक केंद्रावर आवश्यक सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची तपासणी करतील. संवेदनशील व उपद्रवी म्हणून ओळखल्या गेलेल्या परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. अशा ठिकाणी सीसीटीव्ही चित्रिकरणासोबत ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जाणार असून, जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षणाची सोय करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका वाहतूक व उत्तरपत्रिका संकलनासाठी शासकीय वाहनांचा वापर बंधनकारक करण्यात आला असून पोलिस बंदोबस्तही तैनात राहील. याशिवाय भरारी पथके आणि बैठी पथके नियुक्त करून परीक्षा केंद्रांची अचानक तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक भरारी पथकात किमान एक महिला प्रतिनिधी असणे अनिवार्य राहील. बाह्य हस्तक्षेप टाळण्यासाठी केंद्रांभोवती कडक सुरक्षा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित... प्लस I






