मधली काही वर्षे नाशिकमधील औद्योगीकरणाची गती मंदावली होती. मात्र, आता तिने जोर धरला असून, मागील काळात जिल्ह्यात पन्नास हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. दावोस आर्थिक परिषदेत उत्तर महाराष्ट्रासाठी ५५ हजार कोटींचे गुंतवणूक करार केले असून, त्यातून ७५ हजार नवे रोजगार निर्माण होणार आहेत. त्यापैकी तेरा हजार कोटींचे करार एकट्या नाशिक जिल्ह्यासाठी झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी भाषणातून दिली.
‘नाशिक महापालिका निवडणुकीतील नाशिककरांच्या प्रेमाची परतफेड करणार असून, शाश्वत विकासाद्वारे नाशिक शहर व जिल्ह्याला नवा चेहरा दिला जाणार आहे. त्यामुळे नाशिकमधून आता केवळ विमानेच नव्हे, तर विकासही भरारी घेईल,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना आश्वस्त केले.
ओझर विमानतळ बांधकाम व विस्तारीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ओझर विमानतळ आवारात रविवारी हा कार्यक्रम झाला. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, महापौर हिमगौरी आहेर-आडके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळाची प्रवासी क्षमता तिप्पट केली जात असून, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने ५५० कोटींच्या टर्मिनल विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी फडणवीस म्हणाले, ‘देशातील सांस्कृतिक पुनरुत्थानामुळे प्रयागराजच्या कुंभमेळ्याला विक्रमी गर्दी झाली. नाशिकमध्येही २०१५च्या तुलनेत आठ ते दहापट भाविक अधिक येण्याची अपेक्षा असून, त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे. गेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा अधिक वेळ मिळाला असून, तीस हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. त्यातून नाशिक व त्र्यंबकेश्वरला नवीन चेहरा दिला जाईल.’






