बाजारांना ‘टेरिफ’बाधा!

महाराष्ट्र टाइम्स

अमेरिकेकडून टेरिफची धमकी आणि जागतिक बाजारातील विक्रीच्या दबावामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्ही खाली आले. परदेशी निधीचा ओघ कमी झाल्याने आणि धातू, तेल व वायू क्षेत्रातील नुकसानीमुळे बाजारावर दबाव वाढला. मागील चार दिवसांपासून बाजारात घसरण सुरूच आहे. अमेरिकेच्या नवीन धोरणाचा भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांना फटका बसण्याची शक्यता आहे.

बाजारांना ‘टेरिफ’बाधा!
अमेरिकेकडून अतिरिक्त टेरिफची (कर) धमकी आणि जागतिक बाजारातील विक्रीच्या दबावामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स ७८० अंकांनी कोसळून ८४,१८०.९६ वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी २६३ अंकांनी घसरून २५,८७६.८५ वर स्थिरावला. परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेतल्याने आणि धातू, तेल व वायू तसेच कमोडिटी शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे बाजारावर हा दबाव वाढला. गेल्या चार दिवसांत सेन्सेक्स सुमारे १.८४% तर निफ्टी १.७१% घसरला आहे, जी गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी घसरण असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका विधेयकाला पाठिंबा दिला आहे. यानुसार, रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५००% पर्यंत अतिरिक्त कर (टेरिफ) लागू होऊ शकतो. याचा थेट फटका भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांना बसण्याची शक्यता आहे. या 'टेरिफ'च्या चिंतेमुळे बाजारात घसरण सुरूच आहे.
या घसरणीत बीएसई सेन्सेक्स दिवसभरात ८५१ अंकांनी कोसळून ८४,११०.१० पर्यंत खाली आला होता. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध कंपन्यांपैकी ३,१५८ शेअर्स घसरले, तर केवळ १,०३९ शेअर्स वधारले. सेन्सेक्समधील लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्र, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील आणि ट्रेंट यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्सही घसरले. मात्र, इटर्नल, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांचे शेअर्स वधारले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही मोठी घसरण दिसून आली. धातू क्षेत्राचा निर्देशांक ३.३४% घसरला. त्यापाठोपाठ तेल व वायू (३.१५%), वीज (२.९२%) आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका (२.२१%) यांचे निर्देशांकही घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक १.९९% तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक १.९७% घसरला.

जागतिक बाजाराची स्थितीही फारशी चांगली नव्हती. आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी वगळता जपानचा निक्केई, शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग घसरणीसह बंद झाले. युरोपीय बाजारही किरकोळ घसरणीसह व्यवहार करत होते. यामुळे भारतीय बाजारावरही विक्रीचा दबाव वाढला.