जवळपास एक वर्षाहून जास्त कालावधीसाठी भारताच्या टी-२० संघाबाहेर असलेल्या मोहम्मद सिराजसाठी काही दिवस अक्षरशः स्वप्नवत होते. त्यामुळेच भारतीय संघात निवड झाल्याचा सूर्यकुमार यादवचा कॉल आल्यावर सिराजची प्रतिक्रिया, ‘सूर्याभाई मजाक मत करो,’ अशीच होती. त्याच सिराजने पुनरागमनाच्या सामन्यांत तीन विकेट घेत आपली निवड सार्थ ठरवली.
वर्ल्ड कप सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना हर्षित राणा जायबंदी झाल्यामुळे सिराजची संघात निवड करण्यात आली. ‘कुटुंबीयांसह गप्पा मारत असताना अचानक सूर्या भाईचा कॉल आला. त्याने मियाँ तयार हो, बॅग पॅक करून निघायची तयारी कर असे सांगितले. लगेच मी म्हणालो, सूर्या भाई जोक करू नको. त्याने लगेच मला मियाँ मी खरेच सांगतोय, असे सांगितले. त्याचा फोन ठेवत नाही. तोच ओझांचा (प्रज्ञान ओझा, निवड समिती सदस्य) कॉल आला अन् त्यांनी मला ही बातमी सांगितली’, सिराज आपला प्रवास सांगत होता.
भारतीय संघासह सतत असल्यामुळे योजनांची कल्पना होती. अमेरिका संघातील फलंदाजांचे व्हिडिओ पाहून पूर्वतयारी केली . नव्या चेंडूवरील फटकेबाजी सोपी नाही हे आमची फलंदाजी बघताना लक्षात आले. त्यामुळे चेंडूचा टप्पा यष्टीच्या रेषेतच ठेवण्याचे ठरवले, सिराज यशामागचा अभ्यास सांगत होता. सिराजने वर्ल्ड कप टी-२० स्पर्धा हा आपल्यासाठी एक प्रकारचा ब्रेक असल्याचे अपेक्षित केले होते. त्यासाठी प्लॅनही आखला होता. `मी रेयाल माद्रिदचा १५ तारखेचा सामना बघायचे ठरवले होते. त्यानंतर रमझान येत आहे. त्यासाठी पूर्वतयारी केली होती. एक सांगतो, दैवाने जे काही लिहिलेले असते. तेच घडते,' असे सांगत सिराजने हसत निरोप घेतला.






