वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील नेपाळच्या प्राथमिक साखळीतील सर्व लढती मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्याचा आयसीसीचा निर्णय योग्य असल्याचे रविवारी पहिल्याच सामन्यात दिसले. नेपाळ संघाच्या हजारो पाठीराख्यांनी वानखेडे स्टेडियममध्ये गर्दी केली आणि त्यांच्या जल्लोषाने स्टेडियमही दुमदुमले.
वानखेडे स्टेडियमवरील नेपाळ विरुद्ध इंग्लंड सामना सुरू होण्यापूर्वीचा उत्साह पाहून हा सामना काठमांडूत जणू होत असल्याचा भास होत होता. या सामन्यास १७००८ चाहते उपस्थित होते. सामना सुरू झाल्यावर नेपाळच्या चाहत्यांचा जल्लोष जास्त लक्ष वेधून घेत होता. निर्धाव चेंडू, चौकार रोखण्यासाठी केलेले प्रयत्न याचे कौतुक होत होते. दोन वर्षापूर्वीच्या नेपाळ-नेदरलँड्स या डल्लास येथील सामन्यास सुमारे दहा हजार चाहते उपस्थित होते. त्यापेक्षा जास्त गर्दी मुंबईतील सामन्यास झाली. नाणेफेकीच्या तासभर आधीच नेपाळचा ध्वज स्टेडियममध्ये चाहत्यांनी फडकावण्यास सुरुवात केली होती. नेपाळ संघ सामन्यापूर्वी फुटबॉल खेळला. त्यातील कौशल्यासही प्रोत्साहन दिले जात होते. नेपाळच्या चाहत्यांनी जणू संलग्न देशांना प्रवेश दिल्यास त्यांचे चाहते मोठ्या संख्येने येतात आणि त्याचा क्रिकेटला फायदा होत असल्याचे अधोरेखीत केले.






