केवळ क्रिकेटच नव्हे तर टी-२०चा धडाका सुरू केलेल्या इंग्लंडला वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेतील पहिल्या धक्कादायक निकालास सामोरे जावे लागणार असेच वाटत होते. या स्पर्धेसाठी ‘घरचे मैदान’ असलेल्या नेपाळला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये मोठी गर्दी केली होती. नेपाळ संघ लढला, मात्र त्यांचे झुंजार प्रयत्न चार धावांनी कमी पडले आणि इंग्लंड संघाने सोडलेला सुटकेचा निश्वास वानखेडे स्टेडियमनेही अनुभवला.
अखेरच्या चार षटकांत नेपाळला ४५ धावांची गरज होती. त्यामुळे काहीही घडू शकत होते. लोकेश बामने चेंडू सीमापार करण्याचा धडाका सुरू केला. नेपाळने १८व्या षटकांत २२ धावांचा चोप दिला आणि १९व्या षटकांत १४ धावांचा. लक्ष्य सहा चेंडूत दहा झाले. सॅम करनने अखेरचे षटक सुरू केले आणि इंग्लंडने नेपाळवर दडपण आणण्यासाठी दोन चेंडूत वेळ घेतला. हे षटक पूर्ण करण्यास नऊ मिनिटे घेणाऱ्या करनने सर्व चेंडू ‘ब्लॉकहोल’मध्ये टाकत चेंडू सीमापार जाणार नाही याची काळजी घेतली. विल जॅक्सच्या धडाक्यामुळे इंग्लंडने अखेरच्या षटकात २१ धावांची वसूली केली होती. त्याचवेळी नेपाळ पाचच धावा घेऊ शकले. त्यामुळे अखेरच्या षटकापूर्वी १२ धावांनी पुढे असूनही नेपाळ चार धावांनी पराभूत झाले.
हा सामना सोपा नाही हे नेपाळने सुरुवातीपासून दाखवले होते. त्यांनी इंग्लंडचे पहिले तीन फलंदाज ५० धावांत टिपले होते. मात्र जेकब मेथेल आणि हॅरी ब्रूकच्या अर्धशतकामुळे इंग्लंडने १८४ धावा केल्या.
कुशल भुर्तेलने जोफ्रा आर्चरला चार चेंडूंत तीन चौकार मारत जोरदार सुरुवात केली. दीपेंद्रसिंग ऐरी आणि रोहित पौडेलने ५४ चेंडूंत८२ धावा तडकावल्यामुळे लक्ष्य सहा षटकांत ६२ धावा असे झाला. मात्र दीपेंद्र आणि रोहित आठ चेंडूच्या अंतराने बाद झाले. त्यातच या दोन षटकांत धावा झाल्या नाहीत. त्यामुळे इंग्लंड सहज जिंकणार असे वाटत होते. मात्र लोकेशने करनला सलग दोन चौकार आणि आर्चरला सलग दोन षटकार मारत सामन्यात काहीही घडू शकते हेच दाखवले. अखेरच्या षटकात करनने लोकेशला चौकार मारण्यास रोखले. अखेरच्या चेंडूवर एकच धाव झाल्यावर इंग्लंडच्या खेळाडूंनी केवळ एकमेकांना टाळी देण्याची औपचारीकता पार पाडली. त्यावरून त्यांच्यावरील दडपण लक्षात येते.
स्कोअरबोर्ड : इंग्लंड ७ बाद १८४ (जोस बटलर २६, जेकब बेथेल ५५ - ३५ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकार, हॅरी ब्रूक ५३ - ३२ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकार, दिपेंद्रसिंग ऐरी ३-०-२३-२, नंदन यादव ३-०-२५-२) विजयी वि. नेपाळ ६ बाद १८० (रोहित पौडेल ३९ - ३४ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकार, दिपेंद्रसिंग ऐरी ४४ - २९ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकार, लोकेश बाम ३९ - २० चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकार, लियाम डॉसन ४-०-२१-२).






