वानखेडे स्टेडियमवरील मर्यादित षटकांची लढत म्हणजे चौकार, षटकारांचा धडाका, धावांचा पाऊस असेच समजले जात होते. भारतीय क्रिकेट संघाचीही हीच अपेक्षा होती. प्रत्यक्षात या स्टेडियमचे रंग पाहून भारतीय संघव्यवस्थापनास धक्का बसला. या खेळपट्टीवर चेंडू काहीसा थांबून येत होता तसेच फिरकही घेत असल्यामुळे संघास धक्का बसला.
अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, ईशान किशनसारखे भारताचे आक्रमक फलंदाज धडाकेबाज खेळी करू शकले नाहीत. भारताची अवस्थाही ६ बाद ७७ अशी झाली होती. `प्रत्येक सामन्यात परिस्थितीनुसार योजना तयार होतात. मुंबईतील खेळपट्टी प्रामुख्याने फलंदाजीस साथ देणारी असते. त्यामुळे पहिली तीन षटके पाहून किती लक्ष्य असावे हे ठरवणार होतो. अर्थात सुरुवातीस विकेट गेल्यानंतरही आपण किमान दीडशे करणार याची खात्री होती,' असे अक्षरने सांगितले. अर्थात स्पर्धेतील पहिल्या सामन्यातच हा धक्का बसला हे एकप्रकारे चांगलेच झाले. क्रिकेटमध्ये खेळपट्टी नेमकी समजून घेणे आवश्यक असते, असेही तो म्हणाला. इशान किशनने चेंडू कधी वेगाने येत आहे, तर कधी हळूवार असे सांगितल्यामुळे १७० धावा पुरेशा होतील याची खात्री झाली असे सिराजने पत्रकार परिषदेत सांगितले.
सुरुवातीस डाव कोसळल्यामुळे संघावर नक्कीच दडपण आले होते. `गेल्या काही सामन्यात आमचा डाव याप्रकारे घसरलेला नाही. वर्ल्ड कपमध्ये तर नक्कीच नाही. क्रिकेटमध्ये असेच धक्के बसतात. आता हा धक्का पहिल्या सामन्यातच बसला हेही एकप्रकारे चांगले झाले,' असे अक्षरने सांगितले.






