टी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने आयर्लंडवर २० धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने १६३ धावा केल्या होत्या. आयर्लंडला विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत आयर्लंडला १४३ धावांवर रोखले. श्रीलंकेच्या विजयात कुसल मेंडिस आणि कामिंदू मेंडिस यांच्या भागीदारीने महत्त्वाची भूमिका बजावली.
श्रीलंकेने टी-२० वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडवर २० धावांनी दणदणीत विजय मिळवला. आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ १४३ धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेच्या भेदक गोलंदाजीमुळे आयर्लंडला विजयापासून वंचित राहावे लागले.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमावून १६३ धावा केल्या होत्या. सुरुवातीला श्रीलंकेची धावसंख्या १४ षटकांत ४ बाद ८६ अशी होती. मात्र, आयर्लंडच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत श्रीलंकेने अखेरच्या षटकांमध्ये धावांचा डोंगर उभा केला. एका षटकात तर आयर्लंडने तीन झेल सोडले. याचा फायदा घेत कुसल मेंडिस आणि कामिंदू मेंडिस यांनी ३० चेंडूंमध्ये ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. कुसल मेंडिसने नाबाद ५६ धावांची खेळी केली, तर कामिंदू मेंडिसने ४४ धावांचे योगदान दिले.१६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात चांगली झाली होती. एका टप्प्यावर त्यांनी ४ गडी गमावून ११७ धावा केल्या होत्या. विजयासाठी त्यांना अखेरच्या २४ चेंडूंमध्ये केवळ ४७ धावांची गरज होती. मात्र, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सामन्याचे चित्रच पालटले. महीश तीक्षाणाने १७व्या षटकात केवळ ४ धावा देत दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. वानिंदू हसरंगानेही एक विकेट घेत सात धावा दिल्या. अखेरच्या १२ चेंडूंमध्ये आयर्लंडला विजयासाठी ३६ धावांची आवश्यकता होती, पण तळाचे फलंदाज अपेक्षित फटकेबाजी करू शकले नाहीत. मथिशा पथिरानाने अखेरच्या षटकात दोन विकेट्स घेत आयर्लंडला १९.५ षटकांत १४३ धावांवर रोखले.
आयर्लंडकडून हॅरी टेक्टरने सर्वाधिक ४० धावा केल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांमध्ये महीश तीक्षाणाने ४ षटकांत २३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. वानिंदू हसरंगाने ४ षटकांत २५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या, तर मथिशा पथिरानाने २.५ षटकांत २६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेच्या या विजयामुळे त्यांनी वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली आहे.