राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शप ) पक्षाच्या विलीनीकरणावरून सुरू झालेल्या चर्चेला ‘शप’कडून शनिवारी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘विलीनीकरणाचे सूत्र निवडणुकीनंतरच्या चर्चेनंतर ठरवले जाणार होते. चर्चा करणारा नेताच आता राहिलेला नाही. त्यामुळे जर तर अशी चर्चा करण्यात अर्थ नाही. आता यावर आम्हाला भाष्य करायचे नाही’, अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
‘ अजित पवार असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रि करणाबाबतचा निर्णय झाला होता. त्यांच्या पक्षातील अनेक नेते याबाबत बोलत आहेत. मात्र आता आम्ही हा विषय बंद केला आहे. आम्हीच विलीनीकरणाच्या मागे लागलो असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. आमच्याकडून यासाठी घाई करण्यात आलेली नाही. अजितदादांच्या निधनानंतर मात्र तशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर आम्ही फक्त सत्य, शपथपूर्वक बोललो. दादांची ही इच्छा होती ती पूर्ण करायची आहे, एवढेच आम्ही म्हणालो. परंतु, आता यावर बोलायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे’, अशी भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.






