बारामती शहरात ‘वारशाची पहाट’

महाराष्ट्र टाइम्स

बारामतीत सुनेत्रा पवार यांनी पहिला जनता दरबार घेतला. दिवंगत अजित पवारांच्या आठवणीत हा दरबार आयोजित करण्यात आला होता. त्यांनी कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी थेट संवाद साधला. लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि अनेक कामांची तत्काळ दखल घेतली. अजित पवारांच्या कामाची पद्धत आणि बांधिलकी कायम राहील, असा विश्वास व्यक्त झाला. नेतृत्वातील बदलांनंतर जनतेशी संपर्क साधण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न ठरला.

बारामती शहरात ‘वारशाची पहाट’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने बारामतीकरांच्या मनात निर्माण झालेली पोकळी आज भावनिक क्षणांनी भरून निघाल्यासारखी दिसली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीत पहिल्यांदाच जनता दरबार घेतला. दादांच्या कार्यपद्धतीची आठवण करून देऊन त्या भल्या पहाटेच उपस्थित राहिल्या आणि कार्यकर्ते; तसेच सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला.

भल्या सकाळपासून कामाला सुरुवात करण्याची दादांची कार्यशैली बारामतीकरांना अगदी परिचित. त्याच शिस्तीचा आणि तत्परतेचा वारसा जपण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार यांनी या जनता दरबारातून केल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागरिकांच्या तक्रारी, विकासकामांबाबतच्या सूचना आणि वैयक्तिक अडचणी त्या संयमाने ऐकत होत्या. अनेक कामे त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जागेवरच करून दिली.

जनता दरबारात भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. ‘दादा नसले, तरी त्यांची कामाची पद्धत आणि बांधिलकी कायम राहील,’ असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. अजित पवारांनी सुरू केलेला हा दरबार राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. नेतृत्वातील बदलानंतर जनतेशी थेट संपर्क साधून विश्वास पुनर्स्थापित करण्याचा हा सुनेत्रा पवार यांचा पहिला प्रयत्न मानला जातो. अजितदादांच्या कार्यशैलीची छाप असलेला हा पहिला जनता दरबार केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता भावनिक आणि राजकीय दोन्ही अंगांनी महत्त्वाचा ठरला.