यूटर्न घेताना भरधाव टिप्परने कारला धडक दिल्याने युवक ठार तर त्याचे पाच मित्र जखमी झाले. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिटेसूर येथे घडली.
आर्यन गुरुदेव डाफ (वय २१, रा. महाजन कॉम्प्लेक्स, झिंगाबाई टाकळी), असे मृताचे नाव आहे. जखमींमध्ये अभिजित विलास खडके (वय २१, रा. आरती टाउन, गोधनी रोड), गौरव कांबळे (वय २०), रोहन तांडेकर (वय २०), अभिषेक दुरई (वय २१) व अमन पारधी (वय २२, सर्व रा. झिंगाबाई टाकळी) यांचा समावेश आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सकाळी अभिजित व त्याच्या मित्रांनी खापरखेड्यातील बाबुलखेडा येथील हनुमान मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. सर्वजण आर्यन याच्या एमएच-३१-एफई-२१११ या क्रमांकाच्या कारने बाबुलखेडाकडे जायला निघाले. पिटेसूर परिसरात ‘मी आंघोळ केली नाही. त्यामुळे मी येणार नाही’, असे अभिजित म्हणाला. तर ‘माझी परीक्षा सुरू आहे, यायला वेळ लागेल त्यामुळे मी परत जातो’, असे अभिषेक म्हणाला. त्यामुळे सर्वांनी दर्शनाला जाण्याचा निर्णय रद्द केला. अमनने पिटेसूर परिसरात यूटर्न घेतला. याचवेळी भरधाव आलेल्या एमएच-३४-एबी-३०४७ या क्रमांकाच्या टिप्परने कारला धडक दिली. चार ते पाच वेळा कार फिरली व स्वराज फार्मच्या कंपाउंडला आदळली. यात सर्वजण जखमी झाले. अपघातानंतर चालक टिप्पर सोडून पसार झाला. नागरिकांनी धाव घेत जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी आर्यनला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. जखमींवर मानकापूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.






