पॉवरलिफ्टिंगमध्ये नाशिकला सुवर्ण

Contributed byनाशिक|महाराष्ट्र टाइम्स

उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत नाशिकच्या शीतल पाटील आणि मनीषा भामरे यांनी सुवर्णपदके जिंकली. या यशाने त्यांना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरवले. त्याचबरोबर, इंदूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या कुशल चोपडा, स्वरा करमरकर आणि केशिका पूरकर यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. कुशल चोपडाकडे कर्णधारपदाची जबाबदारीही आहे.

पॉवरलिफ्टिंगमध्ये नाशिकला सुवर्ण
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

उत्तराखंडमधील सुपर मास्टर गेम्स अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे झालेल्या आठव्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत शीतल पाटील, मनीषा भामरे या नाशिकच्या खेळाडूंनी सुवर्णपदके पटकावली.

८४ किलो वजनी गटातून शीतल पाटील यांनी सुवर्णपदक मिळवले. शीतल पाटील यांनी ११० किलो स्क्वॉट, ५५ किलो बेंचप्रेस आणि १३० किलो डेडलिफ्ट असा एकूण २९५ किलो वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरले.

५६ किलो वजनगटातून सहभागी झालेल्या मनीषा भामरे यांनीही सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. मनीषा भामरे यांनी ८२.५ किलोचा स्क्वॉट, ३७.५ किलोचा बेंचप्रेस आणि ११० किलोचा डेडलिफ्ट घेत सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या कामगिरीमुळे दुबईतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मार्ग मोकळा झाला आहे. या स्पर्धेत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, नागालँड, आसाम, उत्तराखंड व उत्तर प्रदेश या राज्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षक अशय रानडे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

नाशिक : राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात नाशिकमधील कुशल चोपडा, स्वरा करमरकर व केशिका पूरकर यांची निवड झाली. इंदूर येथे १४ मार्च ते २१ मार्चदरम्यान होणाऱ्या यूटीटी ८७ व्या आंतरराज्य वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ही निवड करण्यात आली. नाशिकच्या कुशल चोपडा याची पुरुष आणि १९ वर्षाखालील मुलांच्या संघात निवड झाली. याचबरोबर चोपडाकडे दोन्ही संघांच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्वरा करमरकरची १७ वर्षांखालील ज्युनिअर व १९ वर्षाखालील युवा संघात, तर केशिका पूरकर हिची सबज्युनिअर संघात निवड झाली.