कोक, कोळसा आणि मीठ या तीन वस्तूंच्या ८०० किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्याच्या वाहतुकीच्या दरामध्ये व काही प्रकारचा माल सोडून इतर मालवाहतुकीच्या दरांवर ३ टक्क्यांचा उपकर (सरचार्ज) सुचविण्यात आला आहे. इतर मालवाहतुकीचे दरात किंवा उतारू भाड्यामध्ये १९६६-६७ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. रेल्वेमंत्री स. का. पाटील यांनी हा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. उतारू भाड्यात वाढ करण्याऐवजी वीस किलोमीटरवरील प्रवासाच्या सीझन तिकिटावरील कर मद्रास, मुंबई आणि कलकत्ता हे विभाग खेरीज करून इतर विभागांत कमी करण्यात येणार आहेत. मद्रास, मुंबई आणि कलकत्ता या विभागात सीझन तिकिटांचे दर सध्याच कमी आहेत. चहा, बिस्किटे, औषधे, वनस्पतितेले या सारख्या नित्योपयोगी जिन्नसांच्या वाहतूक दरात कपात करण्यात आली आहे.
रेल्वेमंत्री म्हणाले की, चौथ्या योजना काळामध्ये रेल्वेने द्यायच्या लाभांशाचे प्रमाण वाढवावे अशी शिफारस संकेत समितीने केली असल्यामुळे १९६६-६७ साली रेल्वेवर सात कोटी रुपयांचा अधिक भार पडणार आहे. अंदाजपत्रकानंतर रेल्वेच्या खर्चामध्ये उत्तरोत्तर वाढ होत गेली. कोळशाच्या किमती वाढल्या. डिझेल तेलावर अधिक कर आकारण्यात आला. नोकरवर्गाला अधिक दराने घरभाडे भत्ता देण्यात आला.
१६ फेब्रुवारी, १९६६






