जुना भंडारा रोड रुंदीकरणात त्रुटी

महाराष्ट्र टाइम्स

जुना भंडारा रोडच्या रुंदीकरणात अनेक त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने या त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे. आमदार कृष्णा खोपडे यांना निवेदन देऊन योग्य कार्यवाहीचे आश्वासन मिळाले आहे. पुनर्वसन योजना आणि योग्य मूल्यांकनाची मागणी करण्यात आली आहे.

जुना भंडारा रोड रुंदीकरणात त्रुटी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

जुना भंडारा रोड (श्यामप्रसाद मुखर्जी मार्ग) येथील प्रस्तावित रस्ते रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेत गंभीर तांत्रिक, प्रक्रियात्मक आणि तथ्यात्मक त्रुटी झाल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रक्रियेमुळे अनेक संपत्तीधारकांना मोठ्या आर्थिक नुकसानीसोबत मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर रुंदीकरणातील सर्व त्रुटी दूर करण्यात याव्यात, अशी मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) केली आहे.

चेंबरद्वारे अध्यक्ष फारुक अकबानी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने यासंदर्भात पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जुना भंडारा रोडवरील अनेक संपत्ती विविध शीट्समध्ये चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आल्या असून ही कार्यपद्धती कायदेशीर तरतुदींनुसार नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये संभ्रम व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात पूर्वीदेखील संबंधित विभागाकडे लेखी आक्षेप व अर्ज सादर करण्यात आले होते. मात्र, अद्याप ठोस आणि सकारात्मक कारवाई झालेली नाही, अशी खंत संघटनेद्वारे व्यक्त करण्यात आली. विशेषतः जी दुकाने जवळपास पूर्णतः अधिग्रहित होणार आहेत, त्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतीही ठोस योजना आखण्यात आली नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. भूमी अधिग्रहण प्रक्रिया पारदर्शक, टप्प्याटप्प्याने आणि कायदेशीर चौकटीत पार पाडले जावी, जेणेकरून व्यापाऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार नाही, अशी मागणी चेंबरतर्फे करण्यात आली. सध्याच्या प्रक्रियेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. रेडीरेकनर दरानुसार नव्याने व योग्य मूल्यांकन व्हावे, त्रुटीपूर्ण अवॉर्ड रद्द अथवा सुधारित करून नव्याने जाहीर करावे, प्रभावित व्यापाऱ्यांसाठी ठोस पुनर्वसन योजना तयार व्हावी, सर्व आक्षेपांवर कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेण्यात यावे, या मागण्यादेखील संघटनेने केल्या.

आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित विभागामार्फत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपाध्यक्ष स्वप्नील अहिरकर, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव दीपक अग्रवाल, अशोक संघवी, जनसंपर्क अधिकारी हुसेन अजानी, सूरजसिंग ठाकूर, अनिल जैन यांची उपस्थिती होती, अशी माहिती चेंबरचे सचिव सीए हेमंत सारडा यांनी दिली.