डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली गणेश घाट परिसरात महापालिका प्रशासनाने उभारलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प विस्ताराच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे. मात्र प्रकल्पावरील कचऱ्याला मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटली आहे. तर प्रकल्पाचे विस्तारीकरण खारफुटी तोडून खाडी पात्रात भराव टाकून केले जात असल्याने स्थानिक नगरसेवक रसिका पाटील, ज्योती पाटील यांनी आक्षेप घेतला. खारफुटीवर अतिक्रमण करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी थेट विष्णूनगर पोलिसात धाव घेतली.
ओल्या कचऱ्याची विल्हेवाट शहरातच लावण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासनाने जुनी डोंबिवली परिसरातील आरक्षित भूखंडावर २०२२मध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. १७ एकरच्या भूखंडावर प्रकल्प तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होताच तिथे कचरा नेण्यास सुरुवात करण्यात आली. सध्या येथे मोठ्या प्रमाणात कचरा नेला जात आहे. मात्र त्या प्रमाणात प्रक्रिया होत नसल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. रहिवाशांकडून दुर्गंधीच्या तक्रारी वाढताच सोमवारी स्थानिक नगरसेविका पाटील यांच्या समवेत कृष्णा पाटील, पवन पाटील आणि कार्यकर्त्यांनी प्रकल्पाची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान खारफुटीवर भराव टाकून प्रकल्पाचे विस्तारीकरण सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने नगरसेवक आक्रमक झाले. भराव करणारा कंत्राटदार किंवा त्यांचे सुपरवाइझर उपस्थित नसल्याने संताप व्यक्त करत या नगरसेवकांनी थेट पोलिस ठाणे गाठले.
कारवाईचे आश्वासन
प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना खारफुटीवरील अतिक्रमणाबाबत लोकप्रतिनिधींचा आक्षेप कळवला. यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी तहसीलदारासह पाहणी करून नंतर कारवाई करणार असल्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींना दिले.






