जादा भाड्याचे आमिष दाखवत वाहने लंपास

महाराष्ट्र टाइम्स

जादा भाड्याचे आमिष दाखवून वाहने फसवणूक करणाऱ्या संदीप शेट्टीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याने राज्यभरातून ३२ वाहने हडपली होती. या वाहनांची किंमत २ कोटी ४४ लाख रुपये आहे. पोलिसांनी ही वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणात आणखी वाहने सापडण्याची शक्यता आहे. नवी मुंबई, जालना, लोणावळा अशा अनेक ठिकाणांहून वाहने जप्त करण्यात आली आहेत.

जादा भाड्याचे आमिष दाखवत वाहने लंपास
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

वाहने भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने अटक केली आहे. त्याने अपहार केलेल्या राज्यभरातील विविध ठिकाणांवरून २ कोटी ४४ लाखांची ३२ वाहने जप्त केली. वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संदीप शेट्टी (३८) असे त्याचे नाव आहे.

नवी मुंबईतील उलवे परिसरात राहणारा संदीप याने तक्रारदार यांना वाहनांसाठी महिन्याला भाडे देण्याचे आमिष दाखवले. प्रत्यक्षात त्यांना कोणतेही भाडे दिले नाही. तसेच त्यांची पाच वाहनेही परत केली नाहीत. ही वाहने इतर व्यक्तींकडे परस्पर गहाण ठेवली. या वाहनांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी ५ फेब्रुवारी रोजी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वागळे युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले, सहायक पोलिस निरीक्षक शरद पाटील यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि अन्य माहितीच्या आधारे संदीप याला अटक केली. चौकशीमध्ये संदीपने अनेकांना जादा भाडे देण्याचे प्रलोभन दाखवून त्यांची वाहने ताब्यात घेतल्याचे समोर आले. ही वाहने परस्पर इतरांकडे गहाण ठेवण्यात आली होती. या प्रकरणात नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, छत्रपती संभाजीनगर, परभणी आदी ठिकाणांवरून ३२ वाहने जप्त केली आहेत.