बदलापूरला दरवर्षी पुराचा धोका लक्षात घेत, शहरासाठी पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगरोत्थान महाअभियांनातर्गत या प्रकल्पासाठी ४०४.५० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. एकूण ३० किलोमीटर लांबीच्या नाल्यांचे यात बांधकाम करण्यात येणार आहे. दोन टप्प्यांत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात नाल्यांचे रूंदीकरण, खोली वाढवण्यात येणार आहे.
वेगाने विस्तारणाऱ्या बदलापूरला दरवर्षी पावसाळ्यात उल्हास नदीच्या पाण्यामुळे पुराचा धोका पोहोचतो. त्याचबरोबर शहरातील पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांतील अनेक नाल्यांवर अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे रूंदी कमी झालेल्या नाल्यांचा प्रवाह अडतो. त्यामुळे पुराचा धोका अधिक वाढत असतो. परिणामी परिसरातील रहिवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून नाल्यांचा प्रवाह सुरळीत करत त्यांचे बांधकाम, रूंदीकरण आणि खोली वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला.
शहरातील एकूण ३० किलोमीटर लांबीच्या नाल्यांचे सर्व्हेक्षण करत मजीप्रा आणि नगरविकास विभागाकडून नाल्यांच्या बांधकामास तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यासाठी २३२.०७ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात १०.७ किलोमीटर लांबीच्या नाल्यांचे बांधकाम आणि खोली वाढवण्याचे काम केले जाणार आहे. रविवारी शनिनगर येथे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्ष प्रियांका दामले उपस्थित होते.
दोन्ही बाजूस संरक्षण भिंत बांधल्याने नाल्यांमध्ये कचरा टाकण्यावर निर्बंध येणार आहेत. मात्र नाल्यांच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.






