डोंबिवली पूर्वेकडील डॉ. रॉथ रोडचे एकीकडे कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू असतानाच या रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या फेरीवाल्यांची महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याबरोबरच अतिक्रमण हटाव पथकाकडून पाठराखण सुरू असल्याचा आरोप होत आहे.
डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्टेशनपासूनच फेरीवाल्यांनी रस्त्याच्या दुतर्फा ठाण मांडल्याने प्रवाशांचा स्थानकाबाहेर गर्दीचा सामना करावा लागतो. फेरीवाल्यांच्या गर्दीतून बाहेर पडणे जिकीरीचे बनते. त्यातच डॉ. रॉथ रोड, पाटकर रस्ता आणि उर्सेकर वाडीतील गल्लीच्या कानाकोपऱ्यात फेरीवाल्यांनी बस्तान बसवले आहे. हे फेरीवाले पादचारी आणि वाहनचालकांवर दादागिरी करतात. आता प्रशासनाकडून रॉथ रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठी लागणारे साहित्य रस्त्यात ठेवण्यात आले आहे. मात्र रस्त्यालगतचे फेरीवाले हटविण्याची कारवाई करण्याची आठवण ग प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना झालेली नाही.
पहिल्या फेरीवाल्याला हटवताच त्याची मोक्याची जागा महापालिकेचेच अधिकारी परप्रांतीय फेरीवाल्यांसाठी मोकळी करून देत असल्याचे बोलले जातआहे. या रस्त्यावर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असताना प्रशासनाला याठिकाणी बसलेले फेरीवाले दिसत नाही का? असा साधा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.






