फेब्रुवारी महिना अर्धा संपला असला तरी बाजारात यावेळी हवा तसा हापूस आंबा पाहायला मिळत नाही. देवगड, रत्नागिरीमधून हापूस आंब्यांच्या केवळ १५-२० पेट्यांचीच आवक बाजारात होत आहे. त्यामुळे यंदा बाजारात हापूस आंब्याची आवक फारच कमीच असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय पुढचा महिनाही हापूस आंब्याची आवक कमीच राहणार असल्याचे सांगण्यात येते.
कोकणातील हापूस आंब्याला फळबाजारात सर्वाधिक मागणी असते. हापूस आंब्याच्या हंगामाची लोक आवर्जून वाट बघत असतात. सर्वसामान्यपणे फेब्रुवारी ते मार्च आणि त्यानंतर एप्रिल ते मे हे हापूस आंब्याचे दोन हंगाम मानले जातात. तसा बाजारात डिसेंबर अखेरपासून हापूस आंबा यायला लागतो. मात्र यावर्षी लांबलेल्या पावसाने आणि त्यानंतर थंडीमुळे आंबा बागायतदारांचे गणित बिघडले आहे. पहिल्यांदा आलेला मोहोर लांबलेल्या पावसाने गळून गेला. त्यानंतर आलेला मोहोर जास्त थंडीत गळाला. तिसऱ्यांदा मोहोर धरला आहे. मात्र या मोहोराला फूट पडून फळधारणा होऊन आंबा तयार होईपर्यंत एप्रिल महिना उजाडणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिना अर्धा संपला तरी बाजारात हवा तसा हापूस आंबा बाजारात आलेला नाही. या आंब्याचे दरही अधिक आहेत.
मार्चमध्येही हापूस आंब्याची आवक कमीच राहणार आहे. ही आवक एप्रिलमध्ये वाढण्याची शक्यता व्यापारी शिवाजी चव्हाण यांनी वर्तवली आहे. तोपर्यंत आंब्याचे दर वाढीव असणार आहेत.






