सोमवारी बदलापूर पश्चिम भागात मोठी कारवाई करण्यात आली. उल्हास नदी किनाऱ्यालगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बदलापूर गाव रस्त्यादरम्यान उभारण्यात आलेली अनधिकृत दुकाने, हॉटेल्स आणि ढाबे यांवर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने बुलडोझर चालवला. दिवसभरात ५०हून अधिक बांधकामे हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पालिकेकडून शहरात दोन आठवड्यांपूर्वी सलग दोन दिवस राबवलेली मोहीम थांबली होती. दरम्यान, शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान पुढे आला होता. त्यानंतर नगर परिषदेने अनधिकृत बांधकामांची यादी जाहीर केली होती. पूर्वीच्या कारवाईदरम्यान व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी लोकप्रतिनिधींमार्फत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तर काही दुकानदारांनी आपले साहित्य काढून घेतले होते. कारवाईत खंड पडल्यानंतर सोमवारी पुन्हा सुरू झालेल्या कारवाईदरम्यान आरक्षणाच्या जागांवर उभारलेल्या काही घरांवरही कारवाई होणार असल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला. मात्र मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी संबंधितांना दोन दिवसांची मुदत दिल्याचे स्पष्ट केले. तसेच गरजूंना बीएसयूपी योजनेअंतर्गत उपलब्ध घरांचा पर्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही प्रशासनाने सांगितले. उर्वरित अनधिकृत बांधकामांवरही टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू राहणार आहे. नागरिकांनी स्वत:हून बांधकामे हटवावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे.








