एल मेंचो याची अखेर

महाराष्ट्र टाइम्स

Mexican forces have killed Nemesio Ruben Oseguera Cervantes, known as 'El Mencho', the head of the powerful Jalisco New Generation Cartel. His death marks the end of the cartel's leadership. This operation, conducted with US intelligence support, is seen as a success for the Mexican government in its fight against drug traffickers.

एल मेंचो याची अखेर

मेक्सिकोतील सर्वांत शक्तिशाली ‘जालिस्को न्यू जनरेशन कार्टल’ या ड्रग कार्टलचा (अमली पदार्थ तस्करांची टोळी) म्होरक्या नेमेसियो रुबेन ओसेगेरा सर्व्हांतेस उर्फ ‘ एल मेंचो ’ हा मेक्सिकोच्या लष्कराने केलेल्या कारवाईत रविवारी मारला गेला. मेंचोच्या मृत्यूमुळे मेक्सिकोतील सर्वांत सामर्थ्यशाली ‘ड्रग कार्टल’चे नेतृत्व संपुष्टात आले आहे. तसेच, देशात ड्रग्ज तस्करांचा बीमोड सुरू असल्याचे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाला ‘दाखवण्यात’ मेक्सिको सरकारला मोठे यश आले आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, रविवारी जालिस्को राज्यातील तापाल्पा येथे मेंचोला पकडण्यासाठी कारवाई करण्यात आली. चकमकीत जखमी झालेल्या मेंचोला मेक्सिको शहरात विमानाने नेत असताना त्याचा मृत्यू झाला. जालिस्को हे फेंटानिलसह मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ अमेरिकेत तस्करी करणाऱ्या टोळीचे मुख्य ठाणे मानले जाते. ‘ही कारवाई मेक्सिकोच्या विशेष दलांनी द्विपक्षीय सहकार्याने तडीस नेली असून, अमेरिकी अधिकाऱ्यांनी पूरक गुप्त माहिती पुरवली’, असे मेक्सिकोतील अमेरिकी दूतावासाने ‘एक्स’वर जाहीर केले. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने एल मेंचोच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास दीड कोटी डॉलरपर्यंतचे बक्षीस जाहीर केले होते. ट्रम्प यांनी कार्टलविरोधी कारवाईत ठोस परिणाम न दिसल्यास अतिरिक्त शुल्क लादण्याची किंवा एकतर्फी लष्करी कारवाईची धमकी मेक्सिकोला दिली होती. फेब्रुवारीमध्ये ट्रम्प सरकारने जालिस्को कार्टलला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते.

भारतीय नागरिकांसाठी सूचना

मेक्सिकोमधील भारतीय दूतावासाने सोमवारी तेथील भारतीय नागरिकांसाठी सावधगिरीचा सल्ला जाहीर केला आहे. जालिस्को, तामाउलिपास, मिचोआकान, गुरेरो आणि न्यूवो लिओन राज्यांत राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत घरातच सुरक्षित राहावे, सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे सांगितले आहे.