मुंबई : डान्सबारबंदी करण्यात आल्यानंतही मुंबईत ऑर्केस्ट्रा बारचा दणदणाट सुरू आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारचालक आणि मालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने मुंबई पोलिसांनी त्यांच्याभोवती नियमांचा फास आवळला आहे. बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांना पार्किंगसाठी जागा नसल्यास आणि त्यांची वाहने रस्त्यावर पार्क केलेली आढळल्यास बारचालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला जात आहे. याचबरोबर ऑर्केस्ट्राच्या आडून गायिकांकडून अश्लीलता, गायिकांपासूनचे अंतर, कामगारांच्या नोंदीचीही तपासणी केली जात असून यामध्ये त्रुटी आढळल्यास कारवाई केली जात आहे.
डान्सबारसाठी सर्वोच्च न्यायालयाने जाचक अटी टाकल्यानंतर अनेक बारचालकांनी ऑर्केस्ट्रा बारच सुरू ठेवण्यावर समाधान मानले. मात्र, केवळ ऑर्केस्ट्रामुळे ग्राहक येत नसल्याने छुप्या मार्गाने नृत्यही या बारमध्ये चालते. परवानगीपेक्षा अधिक बारबाला बारमध्ये ठेवल्या जातात. त्यांना लपविण्यासाठी बारमध्ये अनेक छुप्या जागा तयार केल्या जातात. असे असले तरी बाहेरून सर्व आलबेल आणि नियमानुसारच सुरू असल्याचे चित्र निर्माण केले जाते. दहिसरच्या ‘रेस हॉर्स’मध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे समजताच दहिसर पोलिसांनी छापा टाकला. परमिट रूमच्या बाहेर मद्यपुरवठा केला तसेच आठची परवानगी असताना नऊ गायिका आणि कलाकारांचा वापर केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. महिला कलाकारांना स्टेजवरून खाली उतरण्यास बंदी असतानाही मालाड येथील ‘साई सुखराज’ (आईना) बारमध्ये महिला कलाकार खाली असल्याचे आढळले. तसेच त्यांच्या गळ्यात ओळखपत्रही नव्हते. त्यामुळे पोलिसांनी बारवर कारवाई केली.
चेंबूरच्या ‘मारुती महल’ बारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या बारमध्ये महिला कलाकारांनी ड्रेस कोडनुसार कपडे परिधान न करता अंग प्रदर्शन करणारे कपडे परिधान केल्याचे आढळले. इतकेच नाही तर त्या ग्राहकांसमोर अश्लील हावभाव करताना आढळल्या. अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर साकीनाका येथील ‘स्पाईस रेस्टॉरंट अँड बार’च्या ठिकाणी ग्राहकांना पार्किंगची व्यवस्था नसल्याचे आढळले. कलाकारांचे स्टेज आणि ग्राहकांची बसण्याची व्यवस्था यात नियमाप्रमाणे सुरक्षित अंतर नसल्याने साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सांताक्रूझच्या 'लक्षद्वीप' बारवर महिला कलाकारांनी ओळखपत्र न घातल्याने तर ताडदेवच्या ‘ड्रम बीट’ बारवर नोंदणी नसलेले कामगार आढळल्याने कारवाई करण्यात आली.








