अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाचे टेरिफ बेकायदा ठरवल्यामुळे दोन्ही शेअर बाजारांत सोमवारी उत्साह दिसून आला. परिणामी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, वाहने आणि वित्तीय समभागांची जोरदार खरेदी झाली. यामुळे बीएसई सेन्सेक्स ४७९.९५ अंकांनी वधारून ८३,२९४.६६ वर बंद झाला. एनएसई निफ्टी १४१.७५ अंकांनी वधारून २५,७१३ वर स्थिरावला.
‘सेन्सेक्स’ने दिवसभरात ६७१.४४ अंकांची झेप घेऊन ८३,४८६.१५ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. त्याच वेळी, ‘निफ्टी’ने दिवसभरात २००.२ अंकांची वाढ नोंदवली. ‘सेन्सेक्स’मधील अदानी पोर्ट्स २.९८ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर होती. त्यापाठोपाठ कोटक महिंद्रा बँक, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक, टायटन, महिंद्र अँड महिंद्र आणि लार्सन अँड टूब्रो यांच्या समभागांमध्ये मोठी वाढ झाली.








