नागपूर : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या (एससीजीटी) दुसऱ्या युवा उद्यमी चॅप्टरचे नागपुरात उद्घाटन झाले. नागपूरमधील युवा उद्योजकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. या चॅप्टरच्या अध्यक्षपदी आयसीटी मीडिया प्रा. लि. चे सहसंचालक अमित बोरकर, सचिवपदी इन्स्ट्रुमेंट सेल्स कॉर्पोरेशनचे अंकुश हरकरे, तर कोषाध्यक्षपदी सुतार फर्निचरचे शुभम नवघरे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाला एससीजीटीचे अध्यक्ष अशोक दुगाडे, महासचिव सुहास फडणीस, उपमहासचिव सुभाष गोरे, उप प्रदेशाध्यक्ष बागेश महाजन, शहराध्यक्ष आनंद देव, सचिव प्रवीण झाडगावकर, कोषाध्यक्ष शरद अरसडे आदी उपस्थित होते. ‘महाराष्ट्रीयन तरुणांनी केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता उद्योग-व्यवसाय क्षेत्रात पुढे यावे आणि त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी सक्षम नेटवर्क उपलब्ध व्हावे या ध्येयाने एससीजीटी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहे’, अशी माहिती यावेळी देण्यात आली. नागपूर युवा उद्यमी चॅप्टरच्या स्थापनेमुळे विदर्भातील नवउद्योजकांना नवे व्यासपीठ मिळणार असून व्यवसायवृद्धीला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. संचालन श्वेता सहस्रभोजनी यांनी केले. आभार आशिष तगलपल्लेवर यांनी मानले.








