कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आयोजित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीचा सर्वसमावेशक विकास करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ अंतर्गत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’ (एआय फॉर ॲग्री २०२६) चे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात डिजिटल पायाभूत सुविधा आणि एआयला राष्ट्रीय विकासात प्राधान्य देण्यात आले आहे. ‘इंडिया एआय मिशन’च्या धर्तीवर राज्याने सर्वसमावेशक कृषी एआय धोरण जाहीर केले असून असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे’. शेतकऱ्यांसाठी ‘महा-विस्तार एआय’ हा डिजिटल साथीदार विकसित करण्यात आला आहे. शेती सल्ला, हवामान अंदाज, कीड व्यवस्थापन, बाजारभाव आणि शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होत आहे. आतापर्यंत ३० लाख शेतकरी या अ ॅपशी जोडले गेले असून नोंदणी वाढत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
‘महाराष्ट्राचे धोरण
अनुकरणीय’
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी महाराष्ट्राची ‘अ ॅग्री एआय पॉलिसी’ इतर राज्यांसाठी अनुकरणीय असल्याचे नमूद केले. एआय क्षेत्रातील भारताची प्रगती जागतिक स्तरावर उल्लेखनीय ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआयला नैतिकता, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सर्वसमावेशकतेशी जोडले आहे. कृषी क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर सुरू असून पीक उत्पादनाचा अंदाज, योग्य पिकांची निवड, हवामान अंदाज, रोगांचे लवकर निदान आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. शेतकऱ्यांसाठी २२ भारतीय भाषांमध्ये एआय आधारित तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितले.








