‘मिस-सेलिंग’वर ठेवले बोट

महाराष्ट्र टाइम्स

Finance Minister Nirmala Sitharaman has strongly criticized banks for mis-selling insurance products. She urged banks to concentrate on their primary banking functions. Sitharaman highlighted that customers are often pressured into buying new insurance policies even when they already have adequate coverage. This regulatory gap between the Reserve Bank of India and IRDA is causing harm to ordinary citizens.

‘मिस-सेलिंग’वर ठेवले बोट

बँकांकडून विशेषतः विमा उत्पादनांच्या किंवा योजनांच्या केल्या जाणाऱ्या चुकीच्या विक्रीची ( मिस-सेलिंग ) गंभीर दखल घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांवर कडक ताशेरे ओढले.

याशिवाय त्यांनी बँकांना मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या झालेल्या ६२१व्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

बँकांनी त्यांच्या मूळ व्यवसायावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे असे सांगून सीतारामन म्हणाल्या, ‘माझी नेहमीच एक तक्रार राहिली आहे की, जिथे गरज नाही तिथे तुम्ही विमा विकण्यात जास्त वेळ घालवत आहात. मिस-सेलिंग का खपवून घेतले जाणार नाही.’

बँकांनी याबाबतचा निर्णय सोयीस्करपणे रिझर्व्ह बँक आणि ‘इर्डा’ या दोन नियामक संस्थांवर सोपवल्याची टीकाही सीतारामन यांनी केली.

‘ग्राहकांकडे आधीच आवश्यक विमा असतानाही बँका त्यांना नवीन विमा उत्पादने घेण्यास भाग पाडतात. हा विषय विमा नियामकाच्या (इर्डा) अखत्यारीत येतो असे समजून रिझर्व्ह बँकेने त्याकडे दुर्लक्ष केले, तर दुसरीकडे बँका आमच्या नियंत्रणात नाहीत असे इर्डाला वाटते. या नियामक दरीमुळे (रेग्युलेटरी गॅप) सामान्य ग्राहकांचे नुकसान होत आहे. नागरिक गृहकर्जासाठी आपली मालमत्ता किंवा जमीन गहाण ठेवतो, तेव्हा त्याला विमा घेण्यास का सांगितले जाते? मालमत्ता आधीच तिथे असताना तो कशाचा धोका कमी करत आहे,’ असा संतप्त सवालही सीतारामन यांनी केला.