हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या एसी लोकलसाठी काही साध्या लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार असल्याने सामान्य प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनापासून सीएसएमटी/वडाळा ते पनवेल मार्गावर १४ एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवरही बोरिवलीपर्यंत सहाव्या मार्गिकेचे काम शेवटच्या टप्प्यात आल्याने १२ ते १४ एसी फेऱ्या वाढवण्याचे नियोजन सुरू केले आहे.
हार्बर मार्गावर १ डिसेंबर २०२१ रोजी सर्वप्रथम एसी लोकल सुरू करण्यात आली होती. सामान्य लोकलच्या तिकीट-पासच्या तुलनेत एसी लोकलच्या तिकीट-पासचे दर अधिक आहेत. यामुळे या एसी लोकलला कमी प्रतिसाद होता. सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे हार्बर मार्गावरील एसी लोकल पूर्णपणे रद्द करण्यात आल्या होत्या. आता नव्या नियोजनानुसार गर्दीच्या वेळेत धावणारी सकाळी ९.०९ पनवेल-सीएसएमटी आणि सायंकाळी ५.३०ची वडाळा रोड-पनवेल, रात्री ८ वाजताची सीएसएमटी-पनवेल या तीन सामान्य लोकल फेऱ्या रद्द राहणार असून त्याऐवजी एसी लोकल धावणार आहे. सोमवार ते शनिवार दरम्यान वाशी ते वडाळा रोड, सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते वाशी, वडाळा रोड ते पनवेल या मार्गांवर सात अप आणि सात डाउन अशा एकूण १४ लोकल फेऱ्या धावणार आहेत. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी एसी लोकल फेऱ्या रद्द राहतील. त्याऐवजी सामान्य लोकल फेऱ्या धावतील.
पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी ब्लॉक सुरू आहे. सहाव्या मार्गिकेचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यावर चर्चगेट ते विरारदरम्यान १२ ते १४ एसी लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. त्यामुळे २६ जानेवारीला हार्बर रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेवरही वाढीव एसी लोकल फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत.
एसी लोकलच्या अंमलबजावणीला विरोध
एसी लोकलला विरोध नसून त्याची लोकल वेळापत्रकात होणाऱ्या अंमलबजावणीला विरोध आहे. एसी लोकलमध्ये मालडब्यांसाठी स्वतंत्र जागा नाही. सामान्य प्रवाशांना एसीचे भाडे परवडत नाही. यामुळे सामान्य लोकल रद्द करून एसी लोकल चालवू नये. एसी लोकलसाठी विद्यमान लोकल फेरीला धक्का न लावता अतिरिक्त स्वरूपात चालवण्यात यावी, ही प्रवाशांची आग्रही मागणी आहे. प्रवासी संघटनांचीदेखील हीच भूमिका आहे.








