मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या निकालांनी राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र दिसून आले. यंदाच्या निवडणुकीत तब्बल १५ माजी नगरसेवकांना मतदारांनी नाकारत पराभवाचा धक्का दिला आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
निवडणुकीत शिवसेनेचे कमलेश भोईर, माजी महापौर कॅटलीन परेरा, तारा घरत, दिनेश नलावडे, जिल्हाप्रमुख राजू भोईर, भावना भोईर, परशुराम म्हात्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अजमद शेख आणि नरेश पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. तसेच भाजपमधून बंडखोरी करून निवडणूक लढवलेले मीना कांगणे, प्रभात पाटील, रिटा शहा, विनोद म्हात्रे, शिवसेना उबाठा गटाच्या नीलम ढवन आणि भाजपच्या मिरादेवी यादव यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार पराभूत माजी नगरसेवकांची संख्या १५ इतकी आहे. स्थानिक पातळीवरील वाढती नाराजी, अपूर्ण राहिलेली विकासकामे आणि पक्षांतर्गत गटबाजी याचा फटका त्यांना बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.






