निसर्ग बहरला, हौशी पर्यटनाला...

Contributed byनाशिक|महाराष्ट्र टाइम्स
निसर्ग बहरला, हौशी पर्यटनाला...
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
गेल्या काही दिवसांतील पावसाने निसर्ग बहरू लागला आहे. अशातच पावसाच्या हजेरीनंतरच्या पहिल्याच रविवारी सोमेश्वरचा खळाळणारा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या अपेक्षेने तेथे गेलेल्या हौशी पर्यटकांचा मात्र हिरमोड झाला. शहरभरातील खोदलेल्या रस्त्यांचा चक्रव्यूह भेदत धबधबा पाहण्याच्या उत्सुकतेने आलेल्यांना केवळ एखाद्या झऱ्यासारख्या जलधारेचे दर्शन होत असल्याने पाच मिनिटांतच परत फिरावे लागत होते. त्यामुळे ‘निसर्ग बहरला अन् पर्यटक दुरावला’ असे चित्र दिसून आले.

वर्षा सहल हा नाशिककरांचा आवडीचा प्रकार. सोमेश्वर, पहिनेबारी, कश्यपी धरण, गंगापूर धरण, गोदावरी अशा ठिकाणी हजेरी लावत वर्षापर्यटनाचा आनंद लुटणे हा नाशिककरांचा दरवर्षीचा शिरस्ता. पाऊस सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या रविवारी वर्षापर्यटनाला आलेले उधाण दरवर्षी दिसून येते. यंदाही चार दिवसांपासून शहरात पावसाने हजेरी लावल्यानंतरचा पहिलाच रविवार दरवर्षीप्रमाणे पर्यटनासाठी अनुकूल असेल, अशी नाशिककरांची आशा मात्र फोल ठरली. नुकतीच पावसाला सुरुवात झाल्याने गंगापूर धरणातून अद्याप पाणीच सोडलेले नाही. त्यामुळे सोमेश्वर धबधब्याला पाणीच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जे काही पर्यटक येथे मनसोक्त भिजण्याच्या इच्छेने येत होते, त्यांना पाच मिनिटांत परतावे लागत होते. जिथे कुठे थोडे पाणी दिसेल तिथे जाऊन फोटोग्राफी करण्यापुरता आनंद नाशिककरांना लुटता आला. गोदाघाट, तसेच तपोवनातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. गेल्या दोन दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याने पंधरा मिनिटांच्या अंतरावर पोहोचण्यासाठी नाशिककरांना जवळपास एक ते सव्वातास लागत होता. संपूर्ण दिवसभर ही वाहतूक कोंडी अनुभवलेल्या बहुतांश नाशिककरांनी शनिवारी व रविवारी घरीच राहण्याला पसंती दिल्याचे दिसून आले.
शहरातील खोदकामाचा फटका

शहरभरात रस्तोरस्ती सुरू असलेल्या खोदकामामुळे पावसाच्या हजेरीनंतर सर्वच रस्ते चिखलमय झाले आहेत. शहरातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर म्हणजेच गंगापूररोडवरदेखील मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदकाम झाल्याने या भागातील रस्त्यांवर चिखल, पाणी साचले आहे. अन्य रस्त्यांवरही अशीच स्थिती असल्याने बहुसंख्य नाशिककरांनी इच्छा असूनही शहराजवळील पर्यटनस्थळांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. या ठिकाणांवर अगदी तुरळक पर्यटकांनी हजेरी लावली होती. सोमेश्वरकडे जाणारा चिखलमय, निसरडा रस्ता पाहून अनेक दुचाकीस्वार रस्त्यावरून परत फिरल्याचे दिसून आले. धबधब्याला पाणीच नसल्याने पाण्यात खेळण्याऐवजी जवळच्या उपाहारगृहात चहा, भजी आणि गाड्यावरील भाजलेली कणसे खाण्यातच नाशिककरांना समाधान मानावे लागले.