Crowd Of Tourists At Pehenebari And Trimbak Tourist Spots During Monsoon
पहिनेबारीसह त्र्यंबकच्या पर्यटनस्थळांवर गर्दी
Contributed by: त्र्यंबकेश्वर|महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील निसर्ग पर्यटनस्थळांवर पावसाळ्यातील पहिल्याच रविवारी पर्यटकांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने नेमकी रविवारी विश्रांती घेतल्याने मनसोक्त भिजण्याच्या ‘मूड’मध्ये असलेल्या पर्यटकांचा काहीसा हिरमोड झाला.
पहिनेबारी परिसरात सकाळपासून शहरी पर्यटाकांच्या वाहनांची रीघ लागली होती. तथापि, पावसाच्या उघडिपीने प्रसिद्ध नेकलेस धबधबादेखील क्षीण झालेला दिसत होता. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने साहजिकच सुट्टी ‘एन्जॉय’ करण्यासाठी तरुणाईची संख्या अधिक दिसून आली. सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून सहकुटुंब आलेल्यांची संख्याही मोठी होती. अद्याप विशेष जोर नसलेल्या नदी प्रवाहात लहानग्यांसोबत अनेकजण जलक्रीडेचा आनंद घेताना दिसून आले. भाजलेले मक्याचे कणीस आणि गरमागरम मॅगीची चव चाखण्यासाठीही गर्दी झाली होती. स्थानिक वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पहिने नेकलेस धबधबा येथे प्रवेश शुल्क आकारण्यात येते. त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भरपावसात रांगा
त्र्यंबकेश्वर : शनिवारपाठोपाठ रविवारीही त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. रविवार दुपारचे काही तास वगळता पावसाने जोर धरलेला असल्याने भाविकांनी भरपावसात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. देणगी दर्शनरांगेत म्हणजेच २०० रुपये पेड दर्शनाच्या रांगेत उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने असंख्य भाविकांना मंडपाबाहेर थेट पावसात उभे राहावे लागले. त्र्यंबकेश्वरमधील काही रस्ते खोदून ठेवल्याने, तर काहींवर बॅरिकेडिंग केल्याने त्यातून वाट शोधत धापा टाकत तिकीट खिडकीवर पोहोचलेल्या भाविकांना नंतर पुन्हा दर्शनबारीत उभे राहावे लागत होते. पाऊस कोसळत असतानाच रांगही हळूहळू पुढे सरकत असल्याने भाविकांना तासन तास रांगेत थांबावे लागले.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी चारशे, तर रविवारी आठशे पर्यटकांनी अधिकृत प्रवेश शुल्क पास घेऊन धबधबा परिसरात निसर्गपर्यटनाचा आनंद लुटला. प्रत्यक्षात पहिनेबारी परिसरात दहा हजारांच्या दरम्यान पर्यटक आले असावेत, असा अंदाज स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केला. हरिहर किल्यावर तीनशे पर्यटकांना सोडण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले. दुपारनंतर पहिनेचा नेकलेस धबधबा, दुगारवाडी धबधबा, हरिहर किल्ला या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला होता.