पर्यटनस्थळांची ‘नाकाबंदी’

Contributed byपोलिस निरीक्षक,नाशिक,वन परिक्षेत्र अधिकारी|महाराष्ट्र टाइम्स
tourist sites blocked ensuring safe tourism during monsoon
शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्याने सुट्टीनिमित्त पावसाळी पर्यटनाची हौस भागविण्यासाठी नागरिकांनी रविवारी पर्यटनस्थळांवर धाव घेतली खरी. मात्र, तत्पूर्वीच गैरप्रकारांसह अपघात टाळण्यासाठी पोलिस व वन यंत्रणेने पर्यटनस्थळांची ‘नाकाबंदी’ केल्याचे दिसन आले.

गंगापूर धरणाचे ‘बॅक वॉटर’ आणि कश्यपी धरणाजवळ संबंधित पोलिस ठाण्यांच्या पथकांनी तळ ठोकला होता. हरिहरगडावरही नियमानुसार पूर्वपरवानगीने ‘स्टॉप अँड रीलिज’ पद्धतीने तीनशे पर्यटकांना प्रवेश देण्यात आला. दरवर्षी त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्रात पर्यटकांची हुल्लडबाजी होत असल्याने नाशिक पश्चिम वन विभागाने निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार पथकांनी हद्दीत गस्त देत पर्यटकांवर नजर ठेवली. त्यामुळे त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्रातील ब्रह्मगिरी, हरिहरगड, दुगारवाडी धबधबा आणि पहिने येथील नेकलेस फॉल या भागात बऱ्यापैकी स्थिती नियंत्रणात होती. गेल्या महिन्यात कश्यपी आणि गंगापूर बॅक वॉटर परिसरात बुडून पर्यटकांच्या झालेल्या मृत्यूमुळे पोलिसांनीही विशेष खबरदारी घेतली. नाशिक तालुका, त्र्यंबकेश्वर, वाडीवऱ्हे, घोटी, इगतपुरी, हरसूल पोलिसांनी रविवारी सकाळी आठ वाजेपासूनच पर्यटनस्थळांचा ताबा घेतला होता. धरणक्षेत्रालगत जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला. त्या ठिकाणी ‘फिक्स पॉइंट’ नेमून सायंकाळी उशिरापर्यंत पर्यटकांवर लक्ष ठेवण्यात आले. त्यामुळे यंदाच्या पावसाळी पर्यटनात पहिल्या रविवारी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.