‘सीएसआर’वर भिस्त

Contributed byत्र्यंबकेश्वर|महाराष्ट्र टाइम्स
‘सीएसआर’वर भिस्त
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात अमृतस्नानाचे मुख्य स्थान मानल्या जाणाऱ्या कुशावर्त तीर्थाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम खासगी कंपनीच्या ‘सीएसआर’ निधीतून सुरू आहे. एकीकडे राज्य शासन कुंभमेळ्याच्या आयोजनावर ३५ हजार कोटींचा खर्च करीत असताना ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेल्या कुशावर्ताच्या स्वच्छतेसाठी ‘सीएसआर’ निधीवर अवलंबून राहावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

कुशावर्त जलशुद्धीकरण प्रकल्प व देखभालीचे काम एका खासगी कंपनीच्या ‘सीएसआर’ निधीतून, तर अंमलबजावणी दुसऱ्या खासगी कंपनीमार्फत केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जलवाहिनी टाकण्याचे काम रेंगाळले असून, कुशावर्ततीर्थ ते संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर हा महत्त्वाचा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वीज व पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, नागरिकांना दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण भासत आहे.
रस्त्यावर गटारींची उघडी चेंबर, पावसामुळे चिखल आणि अपघाताचा धोका वाढला आहे. अत्यावश्यक प्रसंगी रुग्णवाहिका येणेही कठीण झाले आहे. संत निवृत्तिनाथ महाराज पालखी प्रस्थानावेळीही मोठी गैरसोय झाली. भाविकांच्या गैरसोयीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

कामांच्या दर्जाचे काय?

सिंहस्थ पर्वकाळात कुशावर्तात दररोज लाखो भाविक स्नानासाठी येणार असल्याने स्वच्छता व पाण्याची शुद्धता हा गंभीर मुद्दा ठरणार आहे. योग्य देखभाल न झाल्यास भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प शासकीय यंत्रणेमार्फत उभारून त्याची जबाबदार देखभाल होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.