क्षुब्ध प्रवाशांनी तिकीटकचेरी जाळली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
क्षुब्ध प्रवाशांनी तिकीटकचेरी जाळली
मुंबई, (आमच्या प्रतिनिधीकडून)

घाटकोपर येथे आज सकाळी प्रक्षुब्ध झालेल्या सुमारे पाच हजार रेल्वे प्रवाशांच्या एका जमावाने स्टेशनच्या पूर्वेकडील तिकीट ऑफिसला आग लावून त्याची संपूर्ण नासधूस केली. या प्रकरणी ६१ जणांना अटक करण्यात आली असून रेल्वेचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
संतप्त झालेल्या या जमावाने लोकल गाड्यांवर दगडांचा तुफानी मारा केला. पोलिस अधिकारी व आगीच्या बंब वाल्यांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत तिथे पोलिस अधिकारी जखमी झाले. आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास दोन लोकल गाड्यांची घाटकोपर स्टेशनवर टक्कर होण्याचे थोडक्यात टळले, परंतु प्रवाशांच्या जीविताबद्दल रेल्वे कमालीचा बेदरकारपणा दाखवीत आहे, अशी प्रवाशांची भावना होऊन ते खवळून उटले आणि त्यांनी ही हिंसक निदर्शने केली.

घाटकोपरहून बोरीबंदरला जाणारी एक लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक १वर उभी होती. त्याचवेळी बोरीबंदरहून ठाण्याला जाणारी फास्ट लोकल त्याच मार्गावरून आली. त्या गाडीच्या ड्रायव्हरला प्लॅटफॉर्मवर उभी असलेली लोकल दिसताच त्याने आपली गाडी सुमारे ५०० फूट अलीकडे उभी केली व हा अपघात टळला.

(६ जुलै, १९६६)