शिवसेना नगरसेवकांचासत्ताधाऱ्यांना पाठिंबा

Contributed byयेवला|महाराष्ट्र टाइम्स
शिवसेना नगरसेवकांचासत्ताधाऱ्यांना पाठिंबा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षांचे नगरसेवक एकत्र आले आहेत. या घडामोडीमुळे नगरपरिषद राजकारणात खळबळ उडाली असून, शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांच्यासाठी हा राजकीय धक्का मानला जात आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. बैठकीत शहरातील प्रलंबित विकासकामे , नागरिकांच्या समस्या आणि त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. राज्य आणि केंद्रात महायुती विकासाच्या अजेंड्यावर काम करीत असून, त्याच धर्तीवर येवल्यातही समन्वयाने काम करण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतल्याचे भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या बैठकीला राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे सात नगरसेवक उपस्थित होते. काही नगरसेवक अपरिहार्य कारणांमुळे गैरहजर होते; मात्र तेही लवकरच सहभागी होतील, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. नगरपालिका निवडणुकीत स्थानिक समीकरणांनुसार पक्षांनी स्वतंत्र किंवा वेगवेगळ्या आघाड्यांमधून लढत दिली होती. परंतु, बदललेल्या राजकीय परिस्थितीत आता शहरातील कोणताही प्रभाग विकासापासून वंचित राहू नये, नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असला तरी नागरिकांना विकासकामांचा समान लाभ मिळाला पाहिजे, अशी महायुतीची भूमिका राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘स्थानिक नेतृत्त्वावर नाराजी’

‘शिक्षक आमदार किशोर दराडे, कुणाल दराडे यांच्यावर नाराज असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात समाधानी आहोत. आमची नाराजी पक्षाशी नसून, स्थानिक नेतृत्त्वाशी आहे. आमचा आवाज वरिष्ठांपर्यंत पोहोचला नाही, तर आम्ही राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचीही तयारी ठेवली आहे,’ असे शिवसेनेचे (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.