Uncovering The Milk Adulteration Racketeers In Sinnar Seizing Powder Worth 17 Lakhs
सिन्नरमध्ये सतरा लाखांचा पावडरसाठा जप्त
Contributed by: सिन्नर|महाराष्ट्र टाइम्स•
दूध भेसळीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने सिन्नर तालुक्यात शहा आणि परिसरातील गावांमध्ये धडक कारवाई करीत संशयित भेसळ रॅकेटला मोठा हादरा दिला. तालुक्यातील रामपूर-पुतळेवाडी येथे शनिवारी (दि. ४) रात्री राबविण्यात आलेल्या गुप्त मोहिमेत तब्बल १७ लाख ३७ हजार ५२९ रुपयांचा दूध पावडरचा विनापरवाना साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रशांत रोहिदास काळे (वय २३, रा. रामपूर-पुतळेवाडी) याच्याविरुद्ध वावी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोरांविरोधात मोहीम छेडली आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिक विभागाचे सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एफडीए’चे पथक शनिवारी सिन्नरच्या पूर्व भागात दाखल झाले. शहा, कारवाडी आणि पुतळेवाडी परिसरात पोलिस बंदोबस्तात सुरू झालेल्या या मोहिमेमुळे भेसळ व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये खळबळ उडाली.अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रशांत काळे याने कोणताही वैध अन्न परवाना अथवा खरेदी-विक्रीची कागदपत्रे नसताना मोठ्या प्रमाणात दूध पावडरचा साठा केला होता. हा साठा दूध भेसळीसाठी वापरला जाणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक प्रमोद सरोवर अधिक तपास करीत आहेत.
‘एफडीए’च्या पथकाने दूध भेसळीशी संबंधित आणखी काही ठिकाणांची तपासणी केल्याची चर्चा आहे. काही खवा उत्पादन केंद्रांवरही कारवाई झाल्याची माहिती समोर येत असून, दूध भेसळीच्या साखळीतील काही ‘मोठे मासे’ प्रशासनाच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.