संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे अहिल्यानगरीत स्वागत

Contributed byसिन्नर|महाराष्ट्र टाइम्स
संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे अहिल्यानगरीत स्वागत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी रविवारी (दि. ५) सायंकाळी नाशिक जिल्ह्याची सीमा ओलांडून अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाली. निऱ्हाळे-घोटेवाडी हद्दीतील आशापीर देवस्थान परिसरात नाशिक जिल्हा प्रशासनाने पालखीला भावपूर्ण निरोप दिला, तर अहिल्यानगर प्रशासनाने उत्साहात स्वागत केले. वारीच्या इतिहासात प्रथमच जिल्हा प्रशासनाच्या वतीने निरोप सोहळा पार पडला. यावेळी पालखीसह वारकऱ्यांवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली.

दातली येथील गोल रिंगणानंतर खंबाळे येथील मुक्काम आटोपून पालखीने रविवारी सकाळी भोकणीमार्गे प्रस्थान केले. सुरेगाव, मऱ्हळ आणि निऱ्हाळे या गावांमध्ये वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. मऱ्हळ येथे ग्रामस्थांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती, तर मार्गातील अनेक ठिकाणी वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. निऱ्हाळे येथील श्री बुवाजीबाबा देवस्थानचे दर्शन घेत पालखी आशापीर गडाच्या दिशेने रवाना झाली. घोटेवाडी येथील जिल्हा सरहद्दीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ आणि अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सुदर्शन ममक्का यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी पावसाच्या सरींनीही सोहळ्यात रंग भरला.
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, त्यांच्या पत्नी अश्विनी पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विमला, उपविभागीय पोलिस अधिकारी कांतिलाल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, दीपक पाटील, गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, उपअभियंता अविनाश सहाणे, उपअभियंता अंकित जाधव तसेच सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी प्रशासनाच्या वतीने पालखीला निरोप दिला.