Cracked Roads And Stagnant Waste Citizens Existence At Risk In Nashik
भगदाड पडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीत बाधा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सातपूर : संततधार पावसामुळे शनिवारी शिवाजीनगर येथील कार्बन नाका भागातील रस्त्याला मोठे भगदाड पडले होते. त्यानंतर महापालिकेने दोन जेसीबींद्वारे दुरुस्तीस प्रारंभ केला खरा. मात्र, येथील वायरिंगच्या जाळ्यामुळे भगदाड पडलेल्या ठिकाणच्या दुरुस्तीकामात बाधा निर्माण झाल्याचे चित्र रविवारी दिसून आले. दोन ठेकेदारांच्या चुकीमुळे येथील रस्ता दुरुस्ती व्यवस्थित झाली नसल्याचे बोलले जात आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारांकडून कामात हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे.
कालव्यात कचराफेक पंचवटी : पेठरोड परिसरातील फुलेनगरच्या भागातून वाहणाऱ्या गंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्यात सध्या पाणी साचलेले आहे. अनेकांकडून या साचलेल्या पाण्यातच कचराफेक केली जात आहे. पाण्यातील हा कचरा सडून त्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. पाटबंधारे विभागाकडून या भागातील कचरा काढण्याचे काम केल्यानंतरही पुन्हा कचराफेक होत असल्याने ही समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे येथे कचराफेक करणाऱ्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दुचाकीस्वार जखमी
नाशिकरोड : चारचाकी (एमएच ४८, ए ४७५३) वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार शिवाजी माधव खाडे (रा. जाखोरी) हे गंभीर जखमी झाल्याची घटना जाखोरी गाव परिसरात नुकतीच घडली. खाडे आपल्या दुचाकीवरून जाखोरी गावाकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात खाडे यांच्या उजव्या हातावरून चारचाकीचे चाक गेल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. खाडे यांच्या फिर्यादीवरून चारचाकीचा चालक नीलेश बंडू लहाने (सोनगिरी) याच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरीमाता भागात वृक्षारोपण
पंचवटी : दरीमाता मंदिर परिसरात साधू-महंतांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ‘एक झाड, शंभर वरदान’ ही संकल्पना भारत पिंगळे व शिवाजी धोंगडे यांनी राबविली. छावा भारत क्रांती मिशनचे अध्यक्ष डॉ. विलास पांगारकर, महंत रामसनेहीदास महाराज, महंत शंकरदास महाराज, नरहरी उगलमुगले, अमोल सोनवणे, अतुल पांगारकर आदी यावेळी उपस्थित होते.
‘नंदिनी’काठी अतिक्रमण
सातपूर : त्र्यंबकेश्वर रोडवरील समुद्रनगर सिग्नलच्या बाजूला एका व्यावसायिकाने थेट नंदिनी (नासर्डी) नदीकिनारी भलेमोठे अतिक्रमण केले आहे. एकीकडे सामान्यांना व्यवसाय करताना लाखो रुपये खर्चून गाळा किंवा जागा विकत घ्यावी लागते. परंतु, कुठल्याही प्रकारची परवानगी न घेताच थेट रस्त्याच्या बाजूलाच अतिक्रमण करून अनेक जण व्यवसाय थाटत आहेत. असा व्यवसाय करणाऱ्यांना पाठबळ कोण देते, असा सवाल नागरिक उपस्थित करीत असून, ‘नंदिनी’लगतचे असे अतिक्रमण हटविण्याची मागणीही करीत आहेत.
मंदिरासमोर सुशोभीकरण
पंचवटी : रामकाल पथाच्या कामाअंतर्गत श्री काळाराम मंदिराच्या पूर्व व दक्षिण बाजूची अतिक्रमणे काढून त्या भागाचा विकास करण्यात येत आहे. येथील मोकळ्या केलेल्या भागात मुख्य प्रवेशद्वारासमोरील भागाचेे सुशोभीकरण सध्या करण्यात येत आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या परिसरातील उंच व सखल भाग काढून तो सारखा करण्यात आला असल्याने येथील शोभा वाढली असल्याची भावना स्थानिकांसह भाविक व्यक्त करीत आहेत.