Power Supply Disruption In Kalyan During Heavy Rain
कल्याणमध्ये विजेचा लपंडाव
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मुसळधार पावसादरम्यान कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पूर्वेतील नांदिवली, मलंग रोड, काटेमानिवली, आडीवली-ढोकळीसह अनेक परिसरांतील वीजपुरवठा शनिवारी रात्री खंडित झाला होता. तब्बल आठ ते नऊ तास वीज नसल्याने नागरिकांचे हाल झाले. तर पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील शीतलानगरमध्येही शनिवारी रात्री खंडित झालेला वीजपुरवठा रविवारी सकाळपर्यंत पूर्ववत झाला नव्हता. विशेष म्हणजे तक्रार नोंदविण्यासाठी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.
यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे काही भागांतील वीजवाहिन्या आणि विद्युत यंत्रणांमध्ये बिघाड झाला होता. कर्मचारी रात्रभर पावसात दुरुस्तीचे काम करत होते. काही भागांतील वीजपुरवठा एक-दोन तासांत सुरळीत करण्यात यश आले. मात्र, काही ठिकाणी बिघाडाचे स्वरूप गंभीर असल्याने दुरुस्तीसाठी अधिक वेळ लागला आणि त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.