बेशिस्तांचा ‘सुकाळ’, अपघातांसाठी सांजवेळ ठरतेय ‘काळ’

Contributed byनाशिक|महाराष्ट्र टाइम्स
twilight of road accidents reckless speeds increase the death toll
सिंहस्थापूर्वीची विकासकामे अन् रस्तेदुरुस्तीमुळे शहरातील वाहतूक कोलमडली असून, वाढलेल्या अपघातांमुळे शाळा, महाविद्यालयांसह कार्यालयांतून घरी जाण्याची वेळ ‘काळ’ ठरत आहे. मध्यरात्रीपेक्षा दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत सर्वाधिक अपघात होत असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. रस्त्यांच्या दुर्दशेसह वेगमर्यादा ओलांडण्यासह चालकांच्या बेशिस्तपणामुळे शहरात अपघात वाढल्याची स्थिती आहे.

नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीत सर्वाधिक भीषण अपघात महामार्गांऐवजी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर होत आहेत. यापूर्वी रात्री आठ ते बारा या वेळेत सर्वाधिक अपघातांच्या नोंदी पोलिसांनी केल्या होत्या. मात्र, सन २०२५ प्रमाणे सन २०२६ मध्येही रात्रीऐवजी दुपारी चार ते रात्री आठ म्हणजेच सायंकाळी सर्वाधिक अपघात होत असल्याबाबत वाहतूक पोलिसांनी नोंद केली आहे.
सन २०२५ मध्ये शहरात झालेल्या १७९ प्राणघातक अपघातांमध्ये १९७ जण ठार झाले. सन २०२६ मध्ये आतापर्यंत २५७ अपघातांत ८७ जण ठार झाले आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यासंदर्भात पथकांना आदेश दिले आहेत. त्यानुसार वाहतूक विभागाची पथके कार्यरत असून, वाहनचालकांनी वेगमर्यादा पालनाचे आवाहन करण्यात येत आहे.

मध्यरात्री बारा ते पहाटे चारपर्यंत सर्वांत कमी अपघात झाले असून, दुपारी चार ते रात्री आठपर्यंत ६९ अपघातांची नोंद झालेली आहे. याचाच अर्थ जेव्हा वर्दळ सर्वाधिक असते, तेव्हाच भरधाव वेगामुळे अथवा नियमबाह्य वाहतुकीमुळे रस्ते अपघात होत आहेत. कारण, सायंकाळी शहरासह महामार्गांवर वाहनांची संख्या अधिक असते. त्यातच मध्यरात्र ते पहाटेपर्यंत वर्दळ कमी असून, वेग जास्त असला तरी अपघातांचे प्रमाण कमी आहे.