जुजुत्सु ही जपानमध्ये विकसित झालेली पारंपरिक मार्शल आर्ट आहे. प्रतिस्पर्ध्याशी केवळ ताकदीच्या जोरावर नव्हे, तर त्याची ताकद, गती आणि संतुलन त्याच्याविरुद्ध वापरून त्याला निष्प्रभ करणे, हे तिचे प्रमुख तत्त्व आहे. संयम, आत्मनियंत्रण, मानसिक स्थैर्य आणि योग्य रणनीतीवर या कलेत विशेष भर दिला जातो.
नागपूर : तब्बल तीन वर्षांनंतर होणाऱ्या २०२९च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस ने आतापासूनच संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. भाजपला प्रभावी आव्हान देण्यासाठी तळागाळातील संघटना मजबूत करताना सक्षम, नेतृत्वक्षम आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त जिल्हा-शहराध्यक्ष घडविण्यावर भर देण्यात आला आहे. या अभियानाअंतर्गत पक्ष बांधणीसहित ‘जुजुत्सु’ सारख्या प्रशिक्षण सत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपशी सामना करण्यासाठी काँग्रेस केवळ राजकीयच नाही व शारीरिक दृष्टीकोतूनही सक्षम असे नेतृत्व उभे करीत आहे.लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी करण्यासाठी काँग्रेसने ‘संघटन सृजन अभियान’ सुरू केले आहे. त्याअंतर्गत नव्याने नियुक्त जिल्हा व शहराध्यक्षांसाठी देशभरात १० दिवसांची निवासी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड आदी राज्यांतील प्रशिक्षण पूर्ण झाले असून, लवकरच महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात बूथ ते जिल्हास्तरावरील संघटन उभारणी, सदस्य नोंदणी, कार्यकर्त्यांशी संवाद, निवडणूक व्यवस्थापन, जनआंदोलने, माध्यमांशी संवाद आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर यावर मार्गदर्शन केले जाते. गटचर्चा व कार्यशाळांद्वारे प्रत्येक जिल्ह्यासाठी कृती आराखडाही तयार करून घेतला जातो. काँग्रेस नेते राहुल गांधी , मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह वरिष्ठ नेते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ या सत्रांमध्ये मार्गदर्शन करतात. प्रशिक्षणानंतर प्रत्येक अध्यक्षाला बूथ समित्या सक्रिय करणे, सदस्यसंख्या वाढविणे आणि संघटन विस्ताराची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
राहुल गांधी यांची संकल्पना
या प्रशिक्षणात ‘बेसिक जुजुत्सु’चा समावेश खुद्द राहुल गांधी यांनी करवून घेतला आहे. अलीकडेच हरियाणा येथील कुरुक्षेत्र येथे झालेल्या एका प्रशिक्षणात ते स्वत: मार्शल आर्ट्सच्या वेशात सहभागी झाले होते. ‘जुजुत्सुमध्ये अनेकदा कोलांट्या उड्या खात परत उठून प्रतिस्पर्ध्यावर वार करावा लागतो. तसेच राजकारणात सातत्याने सजग राहून काम करावे लागते. या खेळाचे मूळ तत्त्व केवळ प्रतिस्पर्ध्याला हरविणे नसून त्याची ताकद आणि गती त्याच्याचविरुद्ध वापरणे हे आहे. संघर्षात आक्रमकतेपेक्षा संयम, स्वनियंत्रण आणि योग्य वेळेची निवड कशी महत्त्वाची असते हे हा खेळ शिकवितो. भाजपसोबत लढताना आपल्याला बाबी लक्षात घेत मुख्य उद्दिष्टावर लक्ष केंद्रित ठेवायचे आहे,’ असे मार्गदर्शन गांधी यांनी त्यावेळी केले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे.