Existence Of Tejo Mahal Temple Allahabad High Court Issues Notice
‘तेजो महालय’च्या दाव्याबाबत नोटीस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
ताजमहाल परिसरात अग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान तेजो महालय मंदिर अस्तित्वात असल्याचे घोषित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर, अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले.
अग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान तेजो महालय मंदिर, हरिशंकर जैन आणि अन्य चौघांनी ३ जुलै रोजी ही याचिका दाखल केली होती. ‘या वादग्रस्त जागेची छायाचित्रे घेण्यासाठी, तसेच ‘ॲडव्होकेट कमिशनर’च्या नियुक्तीसाठी करण्यात आलेला त्यांचा अर्ज कनिष्ठ न्यायालयाने चुकीच्या पद्धतीने फेटाळला. त्यानंतर दाखल केलेली पुनरावलोकन याचिकाही ग्राह्य नसल्याच्या कारणावरून फेटाळण्यात आली. मात्र, वादाचा योग्य निकाल लावण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचा दावा जैन यांनी न्यायालयात केला.जैन यांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी केंद्र सरकार आणि एएसआयला या प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच याचिकेतील चौथे प्रतिवादी पंकज कुमार वर्मा यांनाही नोटीस बजावली.
आग्रा जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात केंद्र सरकार, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) आणि पंकज कुमार वर्मा यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.