Objection Raised On Sir Process In Karnataka Demand For Immediate Inquiry
कर्नाटकातील ‘एसआयआर’वर आक्षेप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कर्नाटकात सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेवर आक्षेप घेत एनडीए नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अंबुकुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, या प्रकरणाची त्वरित चौकशी करून सर्व अर्जांची घरोघरी जाऊन फेरपडताळणी करण्याची मागणी केली.
मतदारयाद्या तपासणीतील अनियमिततेसाठी जबाबदार असलेल्या सर्व अधिकारी आणि राजकीय कार्यकर्त्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. केंद्रीय मंत्री आणि सेक्युलर जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी, भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी व शोभा करंदलाजे, कर्नाटक विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक व चलवादी नारायणस्वामी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते यांचा समावेश असलेल्या या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी अंबुकुमार यांची भेट घेऊन ही तक्रार दाखल केली.‘कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या ‘एसआयआर’च्या प्रक्रियेतील मोठ्या अनियमिततेबद्दल आम्ही गंभीर चिंता व्यक्त करत आहोत. ही प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडून मंजूर प्रक्रियेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे लोकशाहीच्या मूळ तत्त्वालाच धक्का बसत आहे’, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार घरोघरी जाऊन पडताळणी करणे आणि प्रत्येक घरातील सदस्यांची ओळख वैयक्तिकरित्या तपासणे आवश्यक असते. मात्र प्रत्यक्ष याचे पालन केले जात नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे अविश्वसनीय आणि सदोष मतदारयादी तयार होईल, असे शिष्टमंडळाने म्हटले आहे.
राज्यात सुरू असलेल्या ‘एसआयआर’च्या प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सोमवारी फेटाळून लावला. ‘या मुद्द्यावरून भाजप व सेक्युलर जनता दल हे पक्ष राजकारण करत आहेत’, असा आरोप त्यांनी केला. ‘‘एसआयआर’ प्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगानेच या आरोपांची चौकशी करावी’, असे त्यांनी नमूद केले.